लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी होत असल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे कठीण जाते. परिणामी, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांची रांग रुग्णालयाबाहेर लावण्याचे आदेश काढले. परंतु आवश्यक सोय न केल्याने रुग्णांना उन्हात तासन्तास उभे राहण्याची वेळ येते.मध्यभारतात केवळ नागपुरात सुपर स्पेशालिट हॉपिटल आहे. यामुळे विदर्भासह आजूबाजूच्या राज्यांतून रुग्ण येतात. सध्या या हॉस्पिटलमधून हृदय शल्यचिकित्सा, (सीव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्युरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्युरोसर्जरी), मूत्रपिंड विकार (नेफ्रालॉजी), मूत्ररोग (युरोलॉजी), पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी) व ‘एन्डोक्रेनॉलॉजी’ अशा आठ विभागातून रुग्णसेवा दिली जाते. या विभागाच्या बाह्यरुग्णाची (ओपीडी) वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत असल्याने आणि प्रत्येक विभागाच्या ओपीडी आठवड्यातून दोनच दिवस असल्याने त्या-त्या दिवशी रुग्णांची प्रचंड गर्दी होते. रुग्ण संख्येच्या तुलनेत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागाचा परिसर कमी पडतो. विशेषत: सोमवार ते गुरुवार रुग्णांना दाटीवाटीने उभे रहावे लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गर्दी कमी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ओपीडीमध्ये ५०वर रुग्ण तपासू नका, अशा सूचना केल्या आहेत. तरीही मानवतेच्या दृष्टिकोनातून येथील डॉक्टर आलेला प्रत्येक रुग्ण तपासतो. परंतु रुग्णांच्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंग होत नसल्याने नाईलाजाने रुग्णालय प्रशासनाला रुग्णालयाबाहेर रुग्णांची रांग लावण्याची वेळ आली आहे. परंतु ९ वाजतापासून उन्हाचे चटके लागत असल्याने अनेक रुग्णांना उभे राहणे कठीण जाते. प्रशासनाने यावर उपाययोजना म्हणून रांगेच्या ठिकाणी मंडप टाकल्यास रुग्णांना मदत होऊ शकते.‘टोकन’ सिस्टिम बंदरुग्णालयातील विविध विभागांची आठवड्यातून केवळ दोनच दिवस ‘ओपीडी’ राहते. यामुळे सकाळपासून रुग्णालयात रुग्णांची गर्दी होते. प्रथम येणाऱ्या रुग्णाला प्रथम संधी या तत्त्वावर बाह्यरुग्ण विभागात ‘टोकन सिस्टिम’ लावण्यात आली. यासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु सुरूवातीला काही दिवस चाललेली ही सिस्टिम बंद पडली ती कायमचीच.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : रुग्णांची उन्हात रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 7:31 PM
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी होत असल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे कठीण जाते. परिणामी, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांची रांग रुग्णालयाबाहेर लावण्याचे आदेश काढले. परंतु आवश्यक सोय न केल्याने रुग्णांना उन्हात तासन्तास उभे राहण्याची वेळ येते.
ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगमुळे रुग्णालय अडचणीत