सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मेडिकलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नवीन वर्षात ‘सुपर स्पेशालिटी’ म्हणजेच अतिविशेषोपचार तज्ज्ञाचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू होणार आहे. यात ‘न्यूरो सर्जरी’ पासून ते ‘युरोलॉजी’चे रुग्ण तपासले जाणार आहेत. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या पुढाकाराने सुरू होणारी ही ‘ओपीडी’ राज्यातील पहिला प्रयोग असणार आहे.मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्वच्छता, अद्यावत यंत्रसामुग्री, तज्ज्ञ डॉक्टर व काही प्रमाणात कामकाजात शिस्त आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामुळे याची पावती म्हणून रुग्णांची गर्दी पाच पटीने वाढली आहे. २०१६ मध्ये रुग्णांची संख्या ६४८४३ होती आज ती लाखांवर पोहचली आहे. रुग्णांच्या गर्दीमुळे बाह्यरुग्ण विभागात उभे राहणेही मुश्किल होते. यामुळे रुग्णांना बराच वेळ ताटकळत रहावे लागते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, ट्रॉमा केअर सेंटर सुरू होऊन दीड वर्षे झालीत. शेकडो रुग्णांना याचा फायदा मिळाला. परंतु येथून बरे झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मेडिकल, सुपरमध्ये चकरा माराव्या लागतात. यावर उपाय म्हणून डॉ. निसवाडे यांनी मेडिकलमध्येच सुपर स्पेशालिटी विभागची ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला. नवनवर्षात या ओपीडीला सुरुवात होणार आहे.
अशी असणार ‘सुपर ओपीडी’मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी ओपीडीमध्ये न्यूरो सर्जरी (मेंदूची शस्त्रक्रिया), हार्ट सर्जरी (हृदय शस्त्रक्रिया), पेडियाट्रिक सर्जरी (बालकांवरील शस्त्रक्रिया), प्लास्टिक सर्जरी, मूत्रविकारांवरील ‘युरोलॉजी’ व पोट व यकृताच्या आजारावरील ‘गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी’ तज्ज्ञाचा यात समावेश असणार आहे. यासाठी ‘ट्रॉमा’ व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. हा विभाग तूर्तास अस्थिव्यंगोपचार विभागाच्या ‘कृत्रिम साहित्य तयार करणाऱ्या केंद्रा’च्या जागेवर होणार आहे. सकाळी १० ते १२ ही ओपीडीची वेळ असणार आहे.‘ओपीडी’त प्रत्येक विषयाचा आठवड्यातून एक दिवस असणार आहे. यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाणाºया रुग्णांची संख्या कमी होईल. ट्रॉमा केअर सेंटरमधून बरे झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी या ‘ओपीडी’ची मोठी मदत मिळेल. नववर्षात सुरू होणाºया या ओपीडीचा हळूहळू विस्तारही केला जाईल.-डॉ. अभिमन्यू निसवाडेअधिष्ठाता, मेडिकल