नागपूर : सामान्य नागरिकांकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन लोकसेवकांना रंगेहाथ पकडले. यात एक पोलीस कर्मचारी व वेतन भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधीक्षकाचा समावेश आहे. पहिली कारवाई वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात झाली. एका सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांचे अर्जित रजेचे रोखीचे पैसे रोखून ठेवले होते. १३.३० लाख रुपयांचे रोखीकरण व्हावे यासाठी त्यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी (माध्यमिक) कार्यालय, प्रशासकीय इमारत क्रमांक दोन येथे अनेकदा अर्ज दिले. मात्र काहीच फायदा झाला नाही. प्रमोद झांगोजी सोनटक्के (५३) या अधीक्षकाने त्यांना पैसे हवे असतील तर ५० हजार रुपये द्यावे लागतील असे म्हटले. त्यानंतर तडजोड झाली व ४० हजार रुपये देण्याचे ठरले. आयुष्यभर विद्यार्थ्यांना प्रामाणिकतेचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकाला ही बाब पटली नाही व त्यांनी थेट एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहानिशा केली व सापळा रचला. बुधवारी दुपारी ४० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सोनटक्केला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसाला तीन हजारांची लाच घेताना अटकसदर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या शेख जमील शेख मेहबूबला (५५, नेहरू कॉलनी, पेंशननगर) दीड हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. एका व्यक्तीविरोधात अपघाताचा गुन्हा होता. या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी हवालदाराने पाच हजार रुपये मागितले. तडजोडीअंती तीन हजारांची रक्कम ठरली. संबंधित व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली. प्राथमिक पडताळणी झाल्यावर एसीबीने सापळा रचला. बुधवारी लाच घेताना एसीबीच्या पथकाने हवालदाराला रंगेहाथ पकडले. त्याच्याच पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शिवशंकर खेडेकर, अस्मिता मल्लेलवार, राहुल बराई, पंकज अवचट, सचिन किन्हेकर, विनोद नायगामकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.