लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रद्धा आणि अंधश्रद्धा, यातील फरक न समजलेल्या सर्वसामान्यांना भूल देऊन फसविण्याच्या अनेक घटना राजरोस पुढे येत असतात. याबाबत तर्काचा वापर करणे, सूज्ञ बनण्याची आवाहने चिकित्सक, वैज्ञानिक व जाणकार करत असतात. मात्र, तरीही अशा घटनांना बळी पडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. अशाच एका प्रकरणात एका वृद्धेला एका तांत्रिक महिलेने २५ हजार रुपयांनी लुबाडल्याची घटना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे.
माया भीमराव फुलमाळी (वय ६०, रा. दीपकनगर, गिट्टीखदान) यांच्या मुलाची प्रकृती बरी नसल्याने आणि उपचारांना गुण येत नव्हता. नातेवाईक असलेल्या लताबाई अहिरे यांनी माया यांना वानाडोंगरी परिसरातील तांत्रिक महिला शबाना सौदागर हिच्याकडे नेले. शबाना सौदागर हिने प्रारंभी थातूरमातूर चमत्कार दाखवून फुलमाळी यांचा विश्वास संपादन केला. मुलाला भूतबाधा झाली आहे, घरात भुताचे वास्तव्य आहे, घरात गुप्तधन आहे असा बनाव करत सौदागर हिने फुलमाळी यांना भूल पाडली. राख अंगावरून ओवाळून, राखेचे पाणी देऊन मुलाची व सुनेची प्रकृती बरी होईल, असा बनाव करून सौदागर हिने माया फुलमाळी यांच्याकडून टप्प्याटप्प्यात २५ हजार रुपये घेतले. शिवाय घरातील गुप्त धन काढून तुमची परिस्थिती बदलवून टाकू, अशा थापा मारल्या. मात्र, अंगारा-धुपाऱ्याने मुलाची प्रकृती सुधारत नसल्याचे बघून आपण कुठेतरी फसवले जात आहोत, याची जाण होताच माया फुलमाळी यांनी शबाना सौदागर हिच्याकडे दिलेली रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र, कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेश निमजे यांच्या सहकार्याने त्यांनी एमाआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रारंभी ऐनकेन कारणे सांगून टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनीही जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तांत्रिक महिला शबाना सौदागरे व लताबाई अहिरे यांना अटक केली आहे. सौदागरे हिच्याकडून मंत्रतंत्राचे साहित्य जप्त केले आहे.
अजूनही लोक अंधश्रद्धेला बळी पडतात, हे दु:खद आहे. लोकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. चमत्कार दाखवणे हा गुन्हा नाही. मात्र, चमत्कार दाखवून आर्थिक फसवणूक करणे, हा गुन्हाच आहे. पोलिसांनीही याबाबत योग्य अशा समन्वयाची भूमिका वठविणे गरजेचे आहे.
- हरीश देशमुख, राष्ट्रीय महासचिव - अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती
..