लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी ३५ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. याअंतर्गत लाडकी बहीण योजनेसाठी १,४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल, असे सभागृहात आश्वस्त केले.
विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आमदारांनी त्यांच्या भागातील रखडलेल्या कामांसाठी तसेच काही नव्या कामांसाठी निधीची मागणी केली आहे. काहींनी तातडीने करावयाच्या कामांकडे लक्ष वेधले आहे. पुरवणी मागण्यांमध्ये जेवढे प्रश्न मार्गी लावता येतील तेवढे लावू काही मोठ्या बाबींसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. यासोबतच प्रत्येक आमदारांनी उपस्थित केलेले प्रश्न व मागणीला लेखी उत्तर देण्याचे निर्देश विभागाला दिले जातील, असेही अजित पवार यांनी सांगितले.