डॉक्टर, पोलिसांसह सर्वांना सुरक्षा साधनांचा पुरवठा : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:25 PM2020-05-18T21:25:12+5:302020-05-18T21:25:45+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची लागण होऊ नये याकरिता डॉक्टर व पोलिसांसह सर्व संबंधित ...
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची लागण होऊ नये याकरिता डॉक्टर व पोलिसांसह सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. सिटीझन फोरम फॉर इक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांच्या जनहित याचिकेमध्ये यासंदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, सॅनिटायझर, मास्क व इतर वैद्यकीय वस्तू खरेदी करण्यासाठी पोलीस विभागाला आतापर्यंत २० लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. तसेच, पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालय सॅनिटाईझ करण्यासाठी १८ मे रोजी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेले १६४.४० लाख आणि स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फ ंडमधील ५० लाख रुपये डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन, मेयो रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वितरित करण्यात आले आहेत. या निधीतून एन-९५ मास्क, ट्रिपल लेयर मास्क, सोडियम हायपोक्लोराईट, सॅनिटायझर, हॅण्ड ग्लोव्हज व पीपीई किटची खरेदी करण्यात आली आहे. ही सुरक्षा साधने डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाºयांना वितरित करण्यात आली आहेत.
असे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणे
देशावरील कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, अर्धवैद्यकीय कर्मचारी, पोलीस, फार्मासिस्ट आदी कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरून कर्तव्य बजावत आहेत. त्यांना कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा सर्व कर्मचाºयांची ठराविक कालावधीनंतर कोरोना चाचणी करण्यात यावी. यासंदर्भात राष्ट्रीयस्तरावर तातडीने प्रभावी धोरण तयार करण्यात यावे आणि सर्वांना आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. तुषार मंडलेकर कामकाज पाहत आहेत.
सध्या उपलब्ध पीपीई किट
मेयो - ११,८१३
मेडिकल - १५,४६०
डीसीएस - ३,४६०
डीएचओ - ६५०
एकूण - ३१,३८३