नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे व खासदार शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. नागपूर शहर व ग्रामीणमधील ३३ प्रदेश प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करतील. नागपुरातील बहुतांश मतदार हे खरगे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र असून, ते खरगे यांनाच मतदान करण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात खासदार थरूर यांनी नागपूरसह सेवाग्रामचा दौरा केला होता. दीक्षाभूमीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी माजी आमदार आशिष देशमुख वगळता काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांनी थरूर यांची भेट घेणेही टाळले होते. खरगे यांच्या उमेदवारी अर्जावर सही करणाऱ्या नेत्यांची नावे पाहता, ते हायकमांडचा उमेदवार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश नेते खरगे यांनाच समर्थन करतील, हे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीसाठी नागपूर शहरातील १८ व नागपूर ग्रामीणमधून १५ असे एकूण ३३ प्रदेश प्रतिनिधी मतदान करतील. यात प्रामुख्याने अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माजी मंत्री विलास मुत्तेमवार या दिग्गज नेत्यांसह माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, आदींचा समावेश आहे. नागपुरातील बहुतांश नेत्यांची खरगे यांच्याशी जवळीक आहे. वासनिक यांचे खरगे यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. परिणामी नागपुरात खरगे यांना एकतर्फी पसंती मिळेल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसमध्ये अनेक वर्षांनंतर लोकशाही पद्धतीने निवडणूक होत आहे. दोन्ही उमेदवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे अमुक उमेदवाराला मतदार करा, असे कुठलेही निर्देश किंवा सूचना पक्षातील नेत्यांकडून नाही. सर्व मतदार आपापल्या पातळीवर योग्य तो निर्णय घेऊन मतदान करतील.
- राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस