नागपूर : वाढत्या कर्करुग्णांचे प्रमाण पाहता नागपूर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटलची गरज होती. सर्व सोयींनीयुक्त तयार होणाऱ्या या हॉस्पिटलमुळे गरीब रुग्णांना निश्चितच फायदा होईल, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. जामठा येथे साडेचौदा एकरावर उभारण्यात येणाऱ्या डॉ. आबाजी थत्ते अनुसंशोधन संचालित राष्ट्रीय कर्करोग हॉस्पिटलच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह सुरेश जोशी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अजय संचेती, शैलेश जोगळेकर, डॉ. आनंद पाठक, ललीत टाकचंदानी, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर व प्रवीण दराडे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. सेवाभावी वृत्तीने रुग्णालय चालविण्याचा आमचा मानस होता. गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज दृष्टिक्षेपात येत असल्याचा आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सर्वांच्या सोयीची जागा आम्ही शोधत होतो. डॉ. पाठक यांनी यासाठी केलेले सहकार्य कुणीही विसरू शकणार नाही, असे सांगून शैलेश जोगळेकर आणि सुनील देशपांडे यांचा नावाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कॅन्सर रोग असा आहे की, गोरगरिबांना त्यासाठी पैसा लावणे परवडत नाही. शिवाय दीर्घकाळ त्यावर उपचार करावा लागतो. सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून एक सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याचा संकल्प आम्ही केला होता. या हॉस्पिटलचे काम कालमर्यादेत निश्चितच पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हॉस्पिटलला लागूनच रुग्णांच्या नातेवाईकांना राहता यावे, यासाठी धर्मशाळा बांधण्यात येईल. संस्थेने नफ्यातोट्याचा विचार न करता सेवा द्यावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश जोशी आपल्या मनोगतात म्हणाले, कॅन्सर रुग्णालयाची गरज आहे, हे सत्य आहे. परंतु हा आजार होऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज आहे. त्या दिशेने देखील काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक खा. अजय संचेती यांनी केले. संचालन शैलेश जोगळेकर यांनी केले. आनंद औरंगाबादकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)३५० खाटा, सहा आॅपरेशन थिएटर या अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह ३५० खाटा राहणार आहेत. सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सहा आॅपरेशन थिएटर राहतील. कॅन्सरवर चांगल्या प्रकारचा उपचार हॉस्पिटलच्या माध्यमातून केला जाणार आहे. या हॉस्पिटलच्या परिसरात नर्सिंग ट्रेनिंग स्कूल, डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कॅन्सर हॉस्पिटलचा गरीब रुग्णांना आधार
By admin | Published: March 01, 2015 2:30 AM