मुख्यमंत्री : मांडवा-बुटीबोरी परिसरात सीमा सुरक्षा दल वसाहतनागपूर : सीमा सुरक्षा दल निवासी परिसराच्या उभारणीसाठी शासन व प्रशासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. मांडवा बुटीबोरी परिसरात सीमा सुरक्षा दलाच्या वसाहत उभारणीच्या शिलान्यासाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, माजी आमदार विजय घोडमारे, सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक रजनीकांत मिश्रा, महानिरीक्षक पीएसआर आंजनेयुलु, कमांडर विजय कायरकर हे उपस्थित होते. देशाला सर्व आंतरिक व बाह्य संकटापासून दूर ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल काम करते. भूकंप, नैसर्गिक आपत्ती, आंतरिक व सीमा सुरक्षा या बाबीकडे हे सुरक्षा दल विशेष लक्ष देते. सीमा सुरक्षा दलाची ही कॉलनी आधुनिक व्हावी यात शाळा, आरोग्य सेवा यासारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी मानवंदना दिली. त्यानंतर शिलान्यासाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बीएसएफतर्फे मुख्यमंत्री व आमदार समीर मेघे यांना स्मृतिचिन्ह बहाल करण्यात आले. आभार महानिरीक्षक पी .एस.आर. आंजनेयुलु यांनी मानले. (प्रतिनिधी)८८ एकर परिसरात वसाहत सीमा सुरक्षा दलात काम करणाऱ्या सैनिकांची वसाहत ८८ एकर क्षेत्रात होत आहे. महिनाभरात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या वसाहतीच्या उभारणीस सुरुवात होईल. ६ कोटी रुपये सध्या उपलब्ध झाले असून लवकरच १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल. या परिसरात निवासस्थाने, आरोग्य सुविधा, शाळा राहतील. सीमा सुरक्षा दलात महाराष्ट्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यासाठी ही वसाहत उभारण्यात येत असल्याचे अतिरिक्त महासंचालक रजनीकांत मिश्रा यांनी सांगितले.
बीएसएफ परिसर उभारणीसाठी सहकार्य
By admin | Published: February 21, 2016 2:55 AM