नागपूर: अनेक वर्षांपासून मागे पडलेला आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे ऐरणीवर आला आहे. कधी नव्हे अशी धार आंदोलनाला मिळाली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नागपूरच्या सकल मराठा समाजाने समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे.
सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चर्चेत आहे. २४ डिसेंबरचा अल्टीमेटम संपल्याने २० जानेवारीपासून मुंबईत उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर, विचार विमर्श करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतिने सक्करदरा चाैकातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमंत मुधोजीराजे भोसले उपस्थित होते.
या बैठकीत डॉ. प्रकाश मोहिते, विजयराज शिंदे, देवीदास किरपाने, नरेंद्र मोहिते, शिरिष शिर्के, मोहन जाधव, मिलिंद साबळे, दत्ता शिर्के, कविता भोसले, वंदना रोटकर, मनीषा मोहिते आदींसह अनेक जण उपस्थित होते. प्रत्येकांनी आपआपली मते मांडली. काही जणांनी आम्ही मराठा आहोत, आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण हवे, अशी भूमीका मांडली. तर, काही जणांनी सकल मराठा समाज म्हणून व्यक्तिगत मताला किंमत नसल्याचे सांगून राज्यातील सकल मराठा समजाने जी भूमिका घेतली त्याचे समर्थन करण्याची गरज विशद केली. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या भूमिकेला कोणत्या पक्षाचा रंग नको, आपापले पक्ष बाजुला सारूनच समाजाच्या बैठकीत या, असेही यावेळी काहींनी खणकावून सांगितले. दरम्यान, जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्यामुळे कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित झालेल्या मराठा समजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. जरांगे यांनाच त्याचे श्रेय आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचे सकल मराठा समाज समर्थन करीत असल्याची भूमीका यावेळी घेण्यात आली.
दुसऱ्याच्या ताटातील घास नको : मुधोजीराजे भोसलेमराठा समजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. त्याचसाठी आम्ही लढा देत आहोत. त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी उभारलेल्या आंदोलनाला आमचे समर्थनच आहे. मात्र, हे आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून नको आहे. ओबीसीच्या कोट्यातील आरक्षण काढून मराठ्याला देणे म्हणजे, दुसऱ्याच्या ताटातील घास काढून घेण्यासारखा प्रकार आहे. तो आम्हाला योग्य वाटत नसल्याची प्रतिक्रिया यावेळी मुधोजीराजे भोसले यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.