‘पटोले बचाव’साठी विदर्भातील समर्थक सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:47 AM2023-02-23T10:47:03+5:302023-02-23T10:50:14+5:30
चेन्निथाला यांची मुंबईत घेतली भेट : द्वेष नको निवडणुकीतील यश बघा
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बचावासाठी अखेर त्यांचे विदर्भातील समर्थक सरसावले. पटोले- थोरात वादात राज्यातील राजकीय परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या माजी खासदार रमेश चेन्निथाला यांची समर्थकांनी मुंबईत टिळक भवन येथे भेट घेत पटोले यांची बाजू मांडली. पटोलेंचा राजकीय द्वेष करणाऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी पटोलेंच्या नेतृत्वात निवडणुकांमध्ये मिळालेले यश बघा, असे साकडेही समर्थकांनी घातले.
माजी खासदार रमेश चेन्निथाला हे सोमवार व मंगळवार असे दोन दिवस मुंबईत होते. या दरम्यान माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, खा. बाळू धानोरकर, माजी मंत्री वसंत पुरके, आ. विकास ठाकरे, आ. प्रतिभा धानोरकर, आ. सुभाष धोटे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आजी आ. अविनाश वारजूरकर, चारुलता टोकस, प्रदेश सचिव राजा तिडके, श्याम उमाळकर आदींनी त्यांची भेट घेत पटोले यांची बांजू मांडल्याची माहिती आहे. पटोले यांनी पक्ष संघटना बळकट केली. विदर्भातील नागपूर व अमरावती या विधान परिषदेच्या दोन्ही जागा जिंकल्या. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राज्यभर त्यांचा दौरा सुरू आहे. बहुतांश माजी मंत्री ईडी व सीबीआय कारवाईच्या भीतीपोटी भाजप नेत्यांविरोधात बोलण्याचे धाडस करीत नाहीत. पटोले हे ईडी, सीबीआयला न घाबरता उघडपणे भाजप नेत्यांवर प्रहार करतात. भारत जोडो यात्रा १७ दिवस महाराष्ट्रात होती. ही यात्रा यशस्वी करण्यात पटोले यांचा मोठा वाटा आहे. यात्रेदरम्यान त्यांनी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांची भेट घालून दिली, असे मुद्दे मांडत लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका पटोले यांच्या नेतृत्वात झाल्या तरच काँग्रेसला यश मिळू शकते, असा दावाही समर्थकांनी केला.
सत्यजित तांबे यांचा विषय नाशिक पुरता मर्यादित आहे. तो राज्याचा विषय नाही. त्यामुळे एका विषयावरून प्रदेशाध्यक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. कसबा व चिंचवड ची पोटनिवडणूक सुरू असताना पक्षाकडून अशा प्रकारे निरीक्षक पाठवून नेते व कार्यकर्त्यांचे लक्ष विचलित करणे योग्य नाही, अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली.