नागपूर : शरीरविक्रय हा व्यवसाय असून तो करणाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करता कामा नये. सज्ञान असलेल्या व सहमतीने शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना पोलिसांनी त्रास देऊ नये तसेच फौजदारी कारवाई करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालाचे स्वागत करत नागपुरातील गंगा-जमुना या वारांगनांच्या वस्तीत गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला.
नागपूरच्या इतवारी भागात गंगा-जमुना नावाने वारांगनांची वस्ती आहे. या वस्तीचा इतिहास जुना आहे. परंतु अमितेश कुमार हे नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून रूजू झाल्यानंतर येथे शरीरविक्रय करणाऱ्या वारांगनांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलिसांच्या कारवाईविरुद्ध वारांगनांनी अनेकदा आंदोलने केली. या आंदोलनाला ज्वाला धोटे यांनी सातत्याने साथ दिली. परंतु पोलिसांच्या कारवाईविरुद्ध कोणीही साथ दिली नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्वाळा दिला. त्याचे जोरदार स्वागत शुक्रवारी वारांगनांच्या वस्तीमध्ये करण्यात आले. ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात गुलाल उधळून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला
यावेळी ज्वाला धोटे म्हणाल्या, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. मानवतेला जपणाऱ्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. गेल्या एक वर्षापासून वारांगना माता-बहिणींवर व त्यांच्या निष्पाप लेकरांवर नागपूर पोलीस आयुक्तांनी जो अमानुष अत्याचार करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली त्यांचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकार व पोलीस प्रशासनाने न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास त्यांच्याविरोधात न्यायालयीन खटला दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.