सुप्रिया सुळे हव्या होत्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा - आशिष देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 12:18 AM2019-10-29T00:18:56+5:302019-10-29T00:20:46+5:30
उशिरा तिकीटवाटप करणे ही काँग्रेस नेतृत्वाची चूक
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मजबूत चेहरा द्यायला हवा होता. असे झाले असते तर निकालांचे चित्र वेगळे असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून ‘प्रोजेक्ट’ करायला हवे होते, असे मत काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार व माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. सोमवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
निवडणुकांना सामोरे जायच्या वेळी आघाडीला प्रभावी चेहरा आवश्यक होता. दुर्दैवाने तसे झाले नाही. यासंदर्भात वेळीच पुढाकार अपेक्षित होता. नागपूर शहरात मुख्यमंत्री लढत असतानादेखील काँग्रेसने वेळेवर उमेदवार घोषित केले. भाजपच्या बालेकिल्ल्यात तरीदेखील काँग्रेस उमेदवारांनी जोरदार टक्कर दिली व सहापैकी दोन जागांवर विजय मिळविला. आम्हाला प्रचार करायला १० ते १२ दिवसच मिळाले. जर दीड महिना अगोदर नाव जाहीर केले असते तर आम्ही मतदारसंघात तळागाळापर्यंत पोहोचू शकलो असतो व मोठा फरक पडला असता. यावेळी झालेली चूक काँग्रेस नेतृत्वाकडून पुढील वेळी सुधारली जाईल अशी अपेक्षा आहे. आम्ही ही चूक सुधारण्यासाठी भाग पाडू, असे प्रतिपादनदेखील आशिष देशमुख यांनी केले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आणखी मोठे पद देऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता बावनकुळे यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. मी कधीही सत्तेच्या मागे नव्हतो व पुढील निवडणुकीत मी परत मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात उभा राहील, असेदेखील ते म्हणाले. यावेळी दक्षिण नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव हेदेखील उपस्थित होते.
गटबाजीत ऊर्जा वाया गेली
दरम्यान, आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे एक पत्रकदेखील जारी केले. यातदेखील त्यांनी काँग्रेसच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानसभेचा कौल हा सत्ताधीशांच्या विरोधातील आहे. परंतु काँग्रेस पक्ष विखुरलेला व नेते सैरभैर झालेले होते. त्यामुळे याअगोर व आतादेखील सत्ता मिळवू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक मुद्यांवर आपले दुर्लक्ष झाले. गटबाजीत ऊर्जा वाया घालवली. केवळ निवडणूक ते निवडणूक मतदारांना भेटल्याने फारसे काही हाताला लागत नाही. मतदारांनी यावेळी आपल्यावर विश्वास टाकला आहे व यात आपण चुकलो तर भविष्यात अडचणीत येऊ, असे यात नमूद करण्यात आले आहे.