निरागस बालक राज पांडेची हत्या करणारा क्रूरकर्मा सूरज शाहू दोषी, सत्र न्यायालयात गुन्हे सिद्ध

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 5, 2023 01:52 PM2023-06-05T13:52:24+5:302023-06-05T13:53:43+5:30

येत्या गुरुवारी होईल शिक्षेवर युक्तीवाद

Suraj Shahu, the brutal killer of innocent boy Raj Pandey, convicted in Sessions Court | निरागस बालक राज पांडेची हत्या करणारा क्रूरकर्मा सूरज शाहू दोषी, सत्र न्यायालयात गुन्हे सिद्ध

निरागस बालक राज पांडेची हत्या करणारा क्रूरकर्मा सूरज शाहू दोषी, सत्र न्यायालयात गुन्हे सिद्ध

googlenewsNext

नागपूर : आईच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी १५ वर्षीय निरागस बालक राज पांडे याचे खंडणीसाठी अपहरण व खून करणारा क्रूरकर्मा आरोपी सूरज रामभूज शाहू (२५) याच्याविरुद्धचे गुन्हे सरकार पक्षाने सिद्ध केले. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी सोमवारी शाहूला खंडणीसाठी अपहरण (भादंवि कलम ३६४-अ) व खून (भादंवि कलम ३०२) या दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरविले. त्याच्या शिक्षेवर येत्या गुरुवारी युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिक्षा जाहीर केली जाईल.

समाजमन सुन्न करणारी ही घटना १० जून २०२१ रोजी घडली होती. राज व सूरज एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील इंदिरा मातानगर वस्तीत राहात होते. दोघांचीही एकमेकांसोबत चांगली ओळख होती. घटनेच्या काही दिवसांपूर्वी राजचे काका मनोज पांडे यांनी सूरजच्या आईचा अपमान केला होता. त्यामुळे सूरज चिडला होता. त्यानंतर त्याने आईच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी राजच्या अपहरणाचा कट रचला.

घटनेच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता त्याने राजला क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेले व सायंकाळी ६ वाजता राजची आई गीता यांना फोन करून मनोज पांडे यांचे मुंडके कापून त्याचा फोटो व्हॉटस् ॲपवर पाठविण्याची मागणी केली, तसेच मागणी पूर्ण न केल्यास राजला ठार मारण्याची धमकी दिली. परिणामी, राजचे वडील राजकुमार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. दरम्यान, पोलिसांनी वेगवान हालचाली करून मध्यरात्रीनंतर सुमारे २ वाजता वर्धा जिल्ह्यातील बोरखेडी येथून सूरजला ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केल्यानंतर सूरजने राजचा खून केल्याची माहिती दिली. या खटल्यात अनुभवी ॲड. विजय कोल्हे यांनी विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिले.

निर्घृण पद्धतीने ठार मारले

सूरजने राजला सालई शिवारातील गोविंदराव वंजारी महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या निर्जन ठिकाणी नेले होते. त्या ठिकाणी राजला दगडाने मारून गंभीर जखमी केले व त्यानंतर सर्जिकल ब्लेडने त्याच्या हाताची नस कापली. त्यामुळे राज जाग्यावरच मरण पावला.

Web Title: Suraj Shahu, the brutal killer of innocent boy Raj Pandey, convicted in Sessions Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.