भूमकाल संघटना : समविचारी संघटनांना विरोध करणारनागपूर : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या पुढाकाराने नुक त्याच झालेल्या बैठकीत केंद्र व राज्य पातळीवर प्रस्तावित सूरजागड खाण प्रकल्प सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. नक्षलग्रस्त भागाचा विकास या गोंडस नावाखाली हे सुरू असले तरी खाण प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू होताच या भागात नक्षलवादी कारवाया वाढतील, अशी भीती भूमकाल संघटनेचे सहसचिव अरविंद सोवनी यांनी व्यक्त केली आहे. खाण प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू होताच नक्षली कारवाया वाढतात, असा देशभरातील अनुभव आहे. ओरिसातील (नियमगिरी), झारखंड (हजारीबाग, सारांडा),पश्चिम बंगालमधील (सिंगूर व नंदीग्राम)तसेच छत्तीसगड राज्यातील लोहान्डीगुडा आदी खाणीच्या भागात याचा प्रत्यय आला. शासनाला स्थानिक आदिवासींच्या खनिजावरील हक्काबाबत भूमिका स्पष्ट करावी लागेल. खनिजातून येणाऱ्या समृद्धीत आदिवासींचा वाटा काय हे सांगावे लागेल. सूरजागडपासून पुढे छत्तीसगड सीमेपर्यंत मोठ्या प्रमाणात खनिज साठे आहेत. त्यामुळे ग्रामसभेच्या माध्यमातून अथवा महामंडळ स्थापन करून आदिवासींना उत्खननाचा अधिकार देण्याचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात करता येईल. यात टाळाटाळ केली तर एटापल्ली, भामरागड भागात नक्षवादी कारवाया वाढतील. ही बाब नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षकांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणावी, असे आवाहन सोवनी यांनी केले आहे. हा प्रकल्प होऊ नये यासाठी समविचारी संघटनांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.(प्रतिनिधी)
‘सूरजागड’मुळे नक्षलवाद वाढण्याचा धोका
By admin | Published: September 04, 2015 2:57 AM