लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकसाथ ८०० कलावंतांच्या संगतीने वाद्यांचा झनकार, मंजुळ स्वरांचा ताल अन् नृत्याची लय अनुभवण्याचे भाग्य आज नागपूरकरांना लाभले. या आविष्कारी कलाकृतीतून साकारल्या गेलेल्या सुरांनी जणू आसमंत भेदला आणि महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरेतून लोकपरंपरेचा वर्षाव ‘सूरताल संसद’च्या माध्यमातून नागपूरच्या धर्तीवर झाला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या खासदार महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वाला शुक्रवारपासून हनुमाननगर क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आरंभ झाला. आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी, त्यांना औक्षण, ओवाळणी घालत पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ‘सूरताल संसद’चे संगीत संयोजक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संगीतकार शैलेश दाणी, प्रसिद्ध बासरीवादक अरविंद उपाध्ये आणि संयोजक गजानन रानडे यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर रंगलेली ‘सूरताल संसद’ म्हणजे नागपूरच्या धर्तीवर स्थानिक कलावंतांद्वारे साकारलेला अनुपम असा आविष्कार होता. ६०० वादक आणि २०० नर्तकांच्या संगतीने हा कार्यक्रम सादर झाला. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील लोकगीते, लोकसंगीत आणि लोककलांचा संगम २० हजार चौ. फुटाच्या रंगमंचावर सादर करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राची महाप्रभात अर्थात ओंकार आणि सूर्यनमस्काराने झाली. एकीकडे विद्यार्थ्यांचा ओंकाराचा नाद तर दुसरीकडे सूर्यनमस्कार आणि विविध वाद्यांचे मधुर स्वर निनादत होते. सोबत, बहारदार नृत्याची जोड मिळाल्याने खासदार सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात मंगलमय झाली. ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या गजरात कलाकारांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे दर्शन घडविले. पंढरपूरची वारी, अभंग, गवळण, पोवाडे, भूपाळी, मंगळागौरीची गाणी, गोंधळ, श्रीगणेशोत्सव, मार्बत महोत्सव आदींसह विविध ठिकाणच्या परंपरांचे दर्शन घडविण्यात आले. ढोलताशे, सतार, गिटार, तबला, ऑक्टोपॅड, ड्रम, टाळ, झांज, लेझिम, तंबोरा, संबळ, गट्टम आदी वाद्यांचा नाद संगितिक प्रवासाचे सारथी ठरले.शान व साधना सरगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आज‘व्हॉईस ऑफ युथ’ म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध गायक, अॅन्कर, मेंटॉर गायक शान, प्रसिद्ध पार्श्वगायिका साधना सरगम आणि भजन सम्राट ललित पंडित यांचा लाईव्ह कॉन्सर्ट शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी खासदार सांस्कृतिक महोत्सवात होत आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात होईल.
सूरताल संसद : आसमंत भेदीला सुरांनी, लोकपरंपरेचा वर्षाव झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:14 AM
एकसाथ ८०० कलावंतांच्या संगतीने वाद्यांचा झनकार, मंजुळ स्वरांचा ताल अन् नृत्याची लय अनुभवण्याचे भाग्य आज नागपूरकरांना लाभले. या आविष्कारी कलाकृतीतून साकारल्या गेलेल्या सुरांनी जणू आसमंत भेदला आणि महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरेतून लोकपरंपरेचा वर्षाव ‘सूरताल संसद’च्या माध्यमातून नागपूरच्या धर्तीवर झाला.
ठळक मुद्दे८०० कलावंतांचा सुरेल अनुपम असा सोहळा‘खासदार सांस्कृतिक महोत्सवा’चा दरवळला आविष्कारी सुगंध