लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बसपाचे प्रदेशाध्यक्ष व उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार सुरेश साखरे यांना बसपातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याच्या त्यांच्यावर ठपका आहे.बसपाचे प्रदेश प्रभारी खा. अशोक सिद्धार्थ यांनी यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, सुरेश साखरे यांनी या विधानसभा निवडणुकीत पूर्ण राज्यभरात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्याऐवजी पक्षाच्या इच्छेविरुद्ध स्वत: उत्तर नागपुरातून निवडणुक लढवली आणि दारुण पराभूत झाले. त्यामुळे पक्षाचेही मोठे नुकसान झाले. बसपा कार्यकर्त्यांमध्ये अशीही चर्चा आहे की, साखरे हे विरोधी पक्षांसोबत मिळलेले होते. यामुळेच त्यांनी विरोधी पक्षांशी हातमिळवणी करून पक्षाच्या मजबूत असलेल्या जागेवर कमजोर उमेदवार उतरविले. यामुळे बसपाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीत प्रचंड असंतोष दिसून आला. त्यामुळे पक्षाच्या केंद्रीय शाखेच्या आदेशानुसार मी सुरेश साखरे यांना आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने न सांभाळल्यामुळे पक्षातून निलंबित करीत असल्याचे म्हटले आहे.साखरे रुग्णालयात दाखल, पदाचा दिला राजीनामादरम्यान सुरेश साखरे हे गुरुवारी दुपारी ३ वाजता शुगर लेवर वाढल्याने रुग्णालयात दाखल झाले. ते सध्या रुग्णालयातच आहेत. त्यांना त्यांच्या निलंबनाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मला अजुनतरी असे कुठलेही पत्र मिळाले नाही. मी रुग्णालयात दाखल आहे, मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. परंतु प्रदेशाध्यक्ष म्हणून मी बसपाच्या पराभवाच नैतिक जबाबदारी स्वीकारुन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी स्वत: उमेदवार असुनही निवडून येऊ शकलो नाही. त्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी माझी म्हणून मी राजीनामा दिल्याचे सांगितले.