नागपूर : निवासी डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपामुळे सोमवारी मेयो व मेडिकल कॉलेजमधील आरोग्यसेवा प्रभावित झाल्या होत्या. ओपीडी व वार्डमध्येही निवासी डॉक्टरांनी सेवा दिल्या नाही, तर आयसीयू व आकस्मिक विभागात डॉक्टर कार्यरत होते. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी डॉक्टरांनी निदर्शने करून विरोध दर्शविला. डॉक्टरांचा संप आणखी दोन-तीन दिवस राहिल्यास आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, ओपीडी व वार्डमध्ये निवासी डॉक्टर संपावर गेल्याने वरिष्ठ डॉक्टरांना सेवा द्यावी लागली. डॉक्टरांची संख्या कमी झाल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला. मेयोमध्ये ५० टक्के ऑपरेशन झाले नाहीत. ओपीडीमध्ये ३० टक्केच रुग्ण होते. मेयोमध्ये सोमवारी १० ऑपरेशन झाले. ओपीडीमध्ये १,१५० रुग्णांवर उपचार झाले. मेडिकल कॉलेजच्या ओपीडीवर थोडाच फरक पडला, तर ३० टक्के ऑपरेशन झाले. ओपीडीमध्ये १,८८४ रुग्णांवर उपचार झाले, तर ४५ ऑपरेशन झाले. दोन्ही रुग्णालयांच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, आंदोलन दोन ते तीन दिवस चालल्यास आरोग्यसेवेवर परिणाम होऊ शकतो.
- १०५ डॉक्टर होते कार्यरत
निवासी डॉक्टरांचा संपाचा परिणाम रुग्णसेवेवर बघायला मिळाला. मेडिकल कॉलेजमध्ये ७० व मेयोमध्ये ३५ डॉक्टर सेवारत आहे. मेडिकलमध्ये वर्षाला ५८० व मेयोमध्ये ३५० निवासी डॉक्टर सेवा देतात. कार्यरत डॉक्टरांना सोडून उर्वरित सर्व संपावर आहेत.
- दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन
सेंट्रल मार्डचे महासचिव डॉ.सजल बंसल म्हणाले की, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल. गेल्या वर्षभरापासून आमच्या मागण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्य शिक्षणमंत्री यांच्यासह विविध स्तरांवर पत्रव्यवहार सुरू आहे, परंतु कुठलाही ठोस निर्णय घेतला गेला नसल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेतला. राज्यभरातील निवासी डॉक्टर या संपात सहभागी आहेत.