लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे आरोग्याची नाडी सुधारण्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. असे असताना, मध्यभारतातील गरिबांच्या आरोग्याचा एकमेव आशेचा किरण असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये ‘सर्जिकल रेटीना’चे डॉक्टर नाहीत. या उपचाराच्या रुग्णांना एकतर खासगीमध्ये किंवा मुंबई, दिल्लीच्या शासकीय रुग्णालयात पाठविले जात आहे. मात्र, अनेकांना जाणे-येणे व राहण्याचा खर्च परडवत नसल्याने नाईलाजाने अंधत्व स्वीकारण्याची वेळ येत आहे.
चष्म्याचा ‘मायनस ६’च्यावर नंबर असलेल्यांना, डोळ्यात खोलवर जखम झालेल्यांना किंवा मधुमेह असलेल्यांच्या रेटिनावर परिणाम होतो. शासकीय रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागात ‘मेडिकल रेटीना’वर उपचार केला जातो, परंतु विशेषज्ञ नसल्याने ‘रेटीना सर्जरी’ होत नाही. रुग्ण असल्यास त्यांंना मुंबईच्या जेजे हॉस्पिटल, दिल्लीच्या एम्स हॉस्पिटल किंवा हैद्राबाद किंवा चैन्नई येथील ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये किंवा खासगी इस्पितळांमध्ये पाठविले जाते. नागपूरच्या मेडिकल व मेयो रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागात रेटीना सर्जरीचे आठवड्यातून सुमारे पाच तर महिन्यातून दहा-पंधरा रुग्ण येतात. परंतु ही सर्जरी होत नसल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत.
सहा महिन्यापूर्वीपर्यंत सुरू होत्या सर्जरी
मेडिकलच्या नेत्ररोग विभागात सहा महिन्यापूर्वीपर्यंत ‘सर्जिकल रेटीना’च्या शस्त्रक्रिया सुरू होत्या. एका महिला डॉक्टरांकडून या शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. परंतु कंत्राट नुतनीकरणासाठी त्यांना वरिष्ठ कक्षाच्या चकरा माराव्या लागत असल्याने त्या सोडून गेल्याचे बोलले जाते. कमी मानधन, रुग्णांची अधिक संख्या व लालफितीशाहीमुळे दुसरे डॉक्टर येत नसल्याचीही माहिती आहे.
शासकीय रुग्णालयात ‘सर्जिकल रेटीना’चे डॉक्टर आवश्यक
मधुमेह आणि बदलत्या लाईफ स्टाईलमुळे ‘सर्जिकल रेटीना’चे रुग्ण वाढत आहे. एकट्या मेडिकलमध्ये महिन्याकाठी या आजाराचे पाच-सहा रुग्ण येतात. परंतु या आजाराचे विशेषतज्ज्ञ नसल्याने त्यांना इतर इस्पितळांमध्ये पाठविले जाते. रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांना या आजाराचे प्रशिक्षण दिल्यास याचा फायदा रुग्णांना होईल, असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.