नागपूर : पूर्व नागपुरातील गंगाजमुना वस्तीवर मंगळवारी पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी अचानक छापा टाकत विविध घरांमधून ३२ वारांगनांना ताब्यात घेतले. यातील काही वारांगना कुलूपबंद खोलीत लपून बसल्या होत्या. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. अनेक दलालांनी तेथून पळ काढला.
नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगाजमुना येथे वेश्या व्यवसायावर बंदी घातली असून, त्यासाठी संपूर्ण परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतानाही तेथील अनेक खोल्यांमध्ये छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू होता. गंगाजमुनात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींकडून बळजबरी देहव्यापार करवून घेतल्या जात असल्याची तक्रार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे होती. ही बाब वरिष्ठांच्या लक्षात येताच मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा घातला. लकडगंज पोलिस ठाणे, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकातर्फे संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. कारवाईची माहिती दलालांना मिळू नये, याची खबरदारी घेण्यात आली होती. पोलिसांनी चहूबाजूंनी छापा टाकला. त्यामुळे ग्राहक व वारांगनांची पळापळ झाली. पोलिसांनी ३२ वारांगनांसह काही दलालांना ताब्यात घेतले. पूर्ण गंगाजमुना परिसरातील खोल्यांची झाडाझडती घेण्यात आली. काही खोल्यांचे कुलूप तोडून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.
शंभरहून अधिक पोलिसांचा फौजफाटा
या छाप्याच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले होते. ७ मोठ्या पोलिस वाहनांतून शंभराहून अधिक महिला-पुरुष कर्मचाऱ्यांनी हा छापा टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती.
पोलिसांचेच ‘अभय’ मिळाल्याने देहव्यापार परत सुरू
नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगाजमुना येथे वेश्याव्यवसायावर बंदी घातली होती. मात्र, तेथील दलाल व वारांगनांची पोलिसांशी ‘लिंक’ आहे. लकडगंज पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून देहव्यापार परत सुरू झाला होता. कारवाईची माहिती दलाल व वारांगनांना अगोदरच मिळत होती. मंगळवारच्या छाप्यांदरम्यान गुप्तता बाळगण्यात आली होती.