लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना राज्य शासन सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करते. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा मुंबईत बुधवारी केली. वाद्यसंगीत क्षेत्रात प्रसिद्ध व्हायोलिनवादक सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी यांना यावर्षीचा पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यांच्या संगीत साधनेचा हा गौरव मानण्यात येत आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची ख्याती आहे. देशविदेशातून त्यांच्याकडे व्हायोलिन शिकण्यासाठी शिष्य येत असतात. धाकडे गुरुजींबरोबरच विविध क्षेत्रातील कलावंतांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यात नाट्यक्षेत्रात रवी पटवर्धन, गायन- माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीत- श्याम देशपांडे, मराठी चित्रपट - उषा नाईक, कीर्तन - ह.भ.प. विनोदबुवा खोंड, शाहीर -शाहीर विजय जगताप, नृत्य - माणिकबाई रेंडके, आदिवासी गिरीजन - वेणू बुकले, तमाशा - चंद्राबाई अण्णा आवळे, लोककला - मोहन कदम व कलादान - श्रीकांत धोंगड यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरुप १ लाख रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.शासनाने माझ्या कलागुणांची कदर केलीसंगीताचा वारसा घरातूनच मिळाला आहे. मी फक्त संगीताची साधना केली आहे. त्यापोटीच अनेक कलावंतांनी माझ्याकडून संगीताचे धडे गिरविले आहे. आता शासनानेही माझ्या कलागुणांची कदर केली आहे. सांस्कृतिक मंत्र्यांनी माझ्या नावाची घोषणा केल्याचा आनंद आहे. मी शासनाचा आभारी आहे.सूरमणी पं. प्रभाकर धाकडे, प्रसिद्ध व्हायोलिनवादक