नागपूर : पोलिस किती महाभयंकर चूक करू शकतात, याचा आश्चर्यकारक नमुना नुकताच पुढे आला. हुडकेश्वर पोलिसांनी एका प्रकरणात दुसऱ्याच महिलेच्या शवविच्छेदन अहवालावरून पती, सासू व सासऱ्याविरुद्ध विवाहितेच्या खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे पती, सासू व सासऱ्याला विनाकारण शारीरिक-मानसिक त्रास सहन करावा लागला. सामाजिक बदनामीला तोंड द्यावे लागले. परिणामी, प्रकरणाचा खटला प्रलंबित असतानाच सासऱ्याने जगाचा निरोप घेतला.
भोजराज वाकोडीकर (४०) असे पतीचे व रेखा (६५) असे सासूचे नाव असून ते इंद्रनगर, नवीन नरसाळा रोड येथील रहिवासी आहेत. सासऱ्याचे नाव पैकूजी (७०) होते. पोलिसांच्या चुकीमुळे या खटल्याचा मुख्य आधारच पोकळ ठरल्याने सत्र न्यायालयाचे न्या. एस. आर. अग्रवाल यांनी हयात असलेल्या पती व सासूला निर्दोष सोडले. सासऱ्याचे नाव मृत्यूनंतर खटल्यातून वगळण्यात आले होते.
विवाहितेचे नाव प्रीती होते. भोजराज व प्रीतीचे १० डिसेंबर २००९ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आहे. प्रीतीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर विम्याचे २ लाख ५० हजार रुपये मिळाले होते. भोजराजने प्रीतीवर दबाव वाढवून त्यातील एक लाख रुपये घेतले होते. या रकमेवरून प्रीतीला नेहमीच शारीरिक-मानसिक त्रास दिला जात होता. याशिवाय प्रीतीला भोजराजचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्यावरूनही भांडणे होत होती. परिणामी, आरोपींनी ११ सप्टेंबर २०१७ रोजी प्रीतीचा नाकतोंड दाबून खून केला, अशी तक्रार प्रीतीच्या भावाने पोलिस ठाण्यात नोंदविली होती. परंतु, पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतर या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेल्या कुसूम पाटील या महिलेच्या शवविच्छेदन अहवालाच्या आधारावर पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचे वकील ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी ही चूक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच, आरोपींविरुद्ध इतर कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे सांगितले व आरोपी निर्दोष सुटले.