नागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अनलॉकनंतर देशातील उद्योगधंदे पूर्वस्थितीत येत असून, देशांतर्गत निर्मित वस्तूंची मागणी वाढली आहे. त्याचा ऑटोमोबाइलसह सर्वच क्षेत्राला मोठा फायदा होत आहे. शिवाय जीएसटी कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. अर्थात देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. वर्तमानस्थितीत देशात अनलॉकनंतर अर्थव्यवस्थेत आश्चर्यजनक वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे मत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम विभागीय अध्यक्ष सीए मनीष गढिया यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.
तीन दिवसीय दौऱ्यात त्यांनी नागपुरातील ५०० पेक्षा जास्त सीएंशी चर्चा केली. नागपूर सीए शाखेच्या धंतोली येथील सभागृहात त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. मनीष गढिया म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था आता मंदीच्या सावटातून बाहेर निघत आहे. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सावधतेने पाऊल उचलत असून, उद्योजक व व्यावसायिकांनाही सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्था आणि एमएसएमईच्या विकासात सीएंची मोठी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत नागपूर सीए शाखेचे अध्यक्ष सीए साकेत बागडिया, उपाध्यक्ष सीए जितेन सागलानी आणि कोषाध्यक्ष सीए अक्षय गुल्हाने उपस्थित होते.