नागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अनलॉकनंतर देशातील उद्योगधंदे पूर्वस्थितीत येत असून, देशांतर्गत निर्मित वस्तूंची मागणी वाढली आहे. त्याचा ऑटोमोबाईलसह सर्वच क्षेत्राला मोठा फायदा होत आहे. शिवाय जीएसटी कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. अर्थात देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. वर्तमानस्थितीत देशात अनलॉकनंतर अर्थव्यवस्थेत आश्चर्यजनक वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे मत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम विभागीय अध्यक्ष सीए मनीष गढिया यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.
तीन दिवसीय दौऱ्यात त्यांनी नागपुरातील ५०० पेक्षा जास्त सीएंशी चर्चा केली. नागपूर सीए शाखेच्या धंतोली येथील सभागृहात त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. मनीष गढिया म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था आता मंदीच्या सावटातून बाहेर निघत आहे. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सावधतेने पाऊल उचलत असून, उद्योजक व व्यावसायिकांनाही सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्था आणि एमएसएमईच्या विकासात सीएंची मोठी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन आयकर पोर्टल लवकरच पूर्ण क्षमतेने काम करणार
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, आयकर पोर्टल सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून पूर्ण क्षमतेने काम करेल. याकरिता पोर्टलचे निर्माते आणि अर्थ मंत्रालयामध्ये इन्स्टिट्यूट मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. नवीनसोबत जुने पोर्टल सुरू ठेवले असते तर आयकराची सर्वच प्रक्रिया पुढील वर्षापर्यंत लांबली असती. नवीन पोर्टल सर्वांगीण आहे. त्याचा वापर सोपा असून तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे.
विद्यार्थ्यांसाठी दोन आठवड्यांचा कोर्स
बी.कॉम. पदवीनंतर विद्यार्थ्यांना तात्काळ रोजगार मिळावा म्हणून संस्थेने केवळ २०० रुपयात दोन आठवड्याचा कोर्स सुरू केला आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर सीए अथवा अकाऊंटिंग फर्ममध्ये अर्धवेळ वा पूर्णवेळ नोकरी मिळेल. ‘टेल लर्न ॲण्ड अर्न’, हा कौशल्य वाढविणारा कोर्स आहे. नागपुरात जवळपास ८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय सीए झाल्यानंतर नोकरीत वा व्यवसायात नसलेल्या महिलांसाठी ‘खोज’ उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात येथील ७६८ महिला सीए उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. त्यांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे.
पत्रपरिषदेत नागपूर सीए शाखेचे अध्यक्ष सीए साकेत बागडिया, उपाध्यक्ष सीए जितेन सागलानी आणि कोषाध्यक्ष सीए अक्षय गुल्हाने उपस्थित होते.