नागपूर : डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधी विकू नये, असा नियम आहे. चिठ्ठीविना औषधी विकणाऱ्यांवर औषध प्रशासन विभागातर्फे कठोर कारवाई करून परवाना निलंबित वा रद्द करण्यात येतो. पण कोरोना काळात फार्मसी चालकांकडे औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. तर नागरिकांनीही कोरोना चाचणीच्या भितीने आजार सांगून फार्मसीमधून औषधी विकत घेतली. चिठ्ठीविना औषधी विकणाऱ्या दुकानांवर औषध प्रशासन विभागाने कारवाई करून अनेकांचे परवाने निलंबित तर काहींचे रद्द केले आहेत.
जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा जास्त फार्मासिस्टचे परवाने आहेत. अनेक दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसतात तर काही ठिकाणी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी देऊ नये, असा नियम आहे, पण बहुतांश फार्मसी चालकांकडून याचे उल्लंघन होत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कारवाईला वेग येत नाही. आकस्मिक तपासणी आणि तक्रारीनंतर होणाऱ्या कठोर कारवायांमुळे फार्मासिस्टचे धाबे दणाणले आहे.
अनेक ठिकाणी मिळतात चिठ्ठीशिवाय औषधी
मेडिकल चौकात औषधांची अनेक दुकाने आहेत. त्यातील बहुतांश रात्रभर सुरू असतात. या दुकानांमध्ये दिवसा वा रात्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी मिळते. येथील एका फार्मासिस्टने पॅरासिटमॉलच्या गोळा चिठ्ठीविनाच दिल्या. या परिसरातील कोणत्याही दुकानात आवश्यक औषधी खरेदीसाठी गेले तर कुणीही चिठ्ठीविना औषधी विकत असल्याचे दिसून आले.
पंचशील चौक, धंतोली, रामदासपेठ परिसरातील औषधांच्या दुकानांमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधी मिळत असल्याचे दिसून आले. फार्मासिस्टने दिलेल्या औषधांनी रूग्ण बरा होत असेल तर त्यात वाईट काय, असा सवालही एका फार्मासिस्टने केला. या परिसरातील बहुतांश फार्मासिस्ट औषधी विकतात. कारवाई कुणावर होते, हा गंभीर प्रश्न आहे.
कोरोकाळात सर्दी-अंगदुखीसाठी डॉक्टरकडे कोण जाणार?
कोरोना काळात सर्वत्र भितीचे वातावरण होते. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे अनेकांना दिसून येत होती. उपचारासाठी डॉक्टरांकडे गेल्यास कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जात होता. त्यामुळे अनेकांनी ओळखीच्या फार्मसीत जाऊन औषधी घेतल्याची उदाहरणे पाहायला मिळाली. अनेकांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधी घेतली. औषधांनी सर्दी, खोकला व अंगदुखी बरी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
अशा झाल्या कारवाया :
४४ फार्मसीवर कारवाई
१ जानेवारी ते १८ ऑगस्ट २०२१ या काळात औषध प्रशासन विभागाने एकूण ४४ फार्मसीवर कारवाई करताना ३८ जणांचे परवाने निलंबित केले तर ६ जणांचे रद्द केले. याशिवाय ९ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले.
अनेक कारणांनी होतो परवाना रद्द
आकस्मिक तपासणी वा तक्रारीनंतर फार्मसीची पाहणी केली जाते. अनेकदा प्रतिबंधित औषधांची विक्री, डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विक्री वा दुकानात फार्मसिस्ट आढळून येत नाही. या शिवाय अन्य कारणांनीही फार्मसीचे निलंबन वा परवाना रद्द करण्यात येतो. अशा प्रकरणांमध्ये ९ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पुष्पहास बल्लाळ, सहायक आयुक्त, औषध प्रशासन विभाग.