भिवापूर : सोयाबीनची पेरणी व कपाशीची लागवड करताच आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाकेश्वर येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
गत १७ जून रोजी तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यातही जवळी, वाकेश्वर, मालेवाडा भागाला पावासाने अक्षरश: झोडपून काढले. पेरलेल्या शेतातून पाण्याचे लोट वाहू लागले. दरम्यान १५ व १६ जून रोजी केलेल्या सोयाबीनच्या पेरण्या व कपाशीची लागवड फसली. खरीपाच्या हंगामात शेतीची मशागत, खते व बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना सावकाराचे दार ठोठवावे लागले. कुठे व्याजाने पैसे घेऊन तर काहींनी उधारवाड करून खते व बियाणांची खरेदी केली. मात्र मुसळधार पावसामुळे अनेकांच्या पेरण्या फसल्या आणि शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीचे सर्वेक्षण करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाकेश्वर येथील शेतकरी गुंडेराव फलके, देवीदास वानखेडे, नितेश वानखेडे, संजय गावंडे, प्रफुल गावंडे, राहुल गावंडे, अशोक चौधरी, सुधीर वानखेडे, जनार्धन गावंडे, तेजराम धोंगडे, झकास वानखेडे, अजाब वानखेडे, सखाराम तिडके, आशिष वानखेडे, विकास इंगळे, विनोद गावंडे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.