लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : सातत्याने पडणाऱ्या पावसाचा फटका सोयाबीन पिकाला बसला असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक हेक्टरमधील सोयाबीनला बुरशी लागली असून, सोयाबीनच्या शेंगावर डाग पडत आहेत, शिवाय कोंब येण्याच्या मार्गावर असून, सततच्या पावसामुळे नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दखल घेत, उमरेड विभागातील पिकांचे सर्वेक्षण करावे आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी, तसेच सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठवून शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले. उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्यामार्फत कृषिमंत्री, तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविण्यात आले.
यापूर्वीही नदी-नाल्यांच्या काठावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळीही सर्वेक्षण करण्यात आले नाही. आता निसर्गाच्या असमतोलपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातील पीक नेस्तनाबूत होत आहे. आधीच मागील अनेक वर्षांपासून नापिकीचे संकट शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले असून, कोरोनामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या समस्येला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ कर्जमाफीची घोषणा करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अश्विन उके, राजेश हजारे, शिवदास कुकडकर, महेश मरघडे, पुरुषाेत्तम बचाले, मधुकर सातपुते, घनश्याम हाडके आदींच्या शिष्टमंडळाने या समस्येकडे लक्ष वेधले आहे.