लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब मजूरवर्गाचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता लक्षात घेता शिक्षण विभागातर्फे १ ते १० मार्च या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम संपूर्ण राज्यात राबविली जात आहे. या अनुषंगाने मौदा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे शिक्षक व मुख्याध्यापकांचे ऑनलाइन प्रशिक्षण नुकतेच पार पडले.
या प्रशिक्षणात तहसीलदार प्रशांत सांगळे, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड, चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्वेक्षणाबाबत माहिती देण्यात आली. गावात कोणताही बालक शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांनी घ्यावी. तसेच सर्वेक्षण करताना कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना गटशिक्षणाधिकारी आशा गणवीर यांनी शिक्षकांना यावेळी दिल्या. सर्वेक्षण करताना स्थानिक लाेकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे. नागरिकांनी आपल्याकडे सर्वेक्षणाकरिता आलेल्या शिक्षकांना सहकार्य करण्याचे आवाहन गणवीर यांनी केले आहे. या माेहिमेत खासगी, अनुदानित शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा सहभाग आहे. त्यानुसार, तालुक्यातील प्रत्येक गावात हे सर्वेक्षण सुरू झाले आहे.