गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शहरातील घरांचा सर्वे करण्याची जबाबदारी मे. सायबरटेक सिस्टिम्स अॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीवर सोपविण्यात आली. परंतु चुकीच्या सर्वेमुळे प्रचंड प्रमाणात घरटॅक्स वाढला. नागरिकांतील रोष विचारात घेता, नगरसेवकांनी सभागृहात चुकीचा सर्वे रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार दुपटीपेक्षा अधिक कर न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानंतरही सायबरटेक कंपनी अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सर्वे करीत असल्याने योग्य टॅक्स आकारणी कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील सहा लाख मालमत्तांचा सर्वे केला जात आहे, सोबतच नवीन मालमत्तावर कर आकारणी केली जात आहे. सायबरटेक कंपनीला आॅक्टोबर २०१७ पूर्वी ७२ वॉर्डातील सर्वे करावयाचा होता. त्यानंतर डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु या कालावधीतही सर्वेचे काम पूर्ण झालेले नाही. मार्च २०१८ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने सुरू असलेल्या सर्वेत पुन्हा त्रुटी व चुका राहण्याची शक्यता आहे.सर्वेचे काम अपूर्ण असल्याने डिसेंबरपूर्वी टॅक्स न भरल्यास मार्च २०१८ पर्यंत आकारण्यात येणारी २ टक्के शास्ती लावली जाणार नाही; मात्र सर्वेची गती विचारात घेता मार्चपर्यंत सर्वेचे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. डिसेंबरपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेनंतर शहरातील ३ लाख १० हजार १७८ हाऊस युनिटचा डाटा पुनर्मूल्यांकनासाठी मालमत्ता विभागाकडे सादर करण्यात आला. यातील २ लाख ६ हजार २८६ हाऊ स युनिटला मंजुरी देण्यात आली आहे, तर ८१ हजार १२७ हाऊ स युनिटच्या सर्वेक्षणात त्रुटी असल्याने हा डाटा फेटाळण्यात आला आहे. जवळपास ४० टक्के घरांचा सर्वे करण्यात आला. यातील एक लाख लोकांना डिमांड पाठविण्यात आल्या. मात्र सर्वेनंतर टॅक्स प्रचंड वाढल्याने नागरिकांत असंतोष पसरला. चुकीच्या सर्वेविरोधात विरोधी पक्षातर्फे वेळोवेळी आंदोलने करण्यात आली.नागरिकांतील रोष विचारात घेता सर्वेसाठी सायबरटेक कंपनीकडून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती होईल. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत महापालिकेच्या कर आकारणी विभागातील कर्मचारी राहतील अशी अपेक्षा होती. परंतु सभागृहात यावर वादळी चर्चा झाल्यानतंरही सर्वे करण्याच्या पद्धतीत सुधारणा झालेली नाही.
डाटा संकलनाचा दावासायबरटेक कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्वेवर नागरिकांचा आक्षेप असला तरी सर्वेमुळे शहरातील मालमत्तांचा डाटा संकलित होत आहे. सर्वेच्या वेळी घरांचे फोटो काढून अपलोड केले जात आहे. यामुळे नवीन मालमत्तांवर कर आकारणी होत आहे, असा दावा कर आकारणी विभागातील अधिकाऱ्यांनी केला.
महापालिकेकडे माहिती नाहीसायबरटेक कंपनीने सर्वेसाठी किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांचे शिक्षण, अनुभव याबाबत महापालिकेच्या कर आकारणी विभागाकडे माहिती उपलब्ध नाही. नगरसेवकांकडून याची मागणी झाल्यानंतर आता हा डाटा संकलित केला जात आहे.
सभागृहात पुन्हा सर्वेचा मुद्दा गाजणारमालमत्ता कर आकारणीसाठी नेमण्यात आलेल्या मे. सायबरटेक कंपनीकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या,त्यांची नावे व शिक्षण यासंदर्भात काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. २० जानेवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात माहिती उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सभागृहात पुन्हा सर्वेचा मुद्दा गाजणार आहे.