लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. आजच्या घडीला शहरातील काही मुख्य रस्त्यांवर एकही झाड दृष्टीस पडत नाही. असे असले तरी सिव्हील लाईन परिसरात अजूनही हिरवळ टिकून आहे. जुनी आणि मोठमोठी झाडे आजही सिव्हील लाईनच्या रस्त्यावर आढळतात. पण आता ही झाडेही अचानक कोसळायला लागली आहे. गुरुवारी प्रशासकीय इमारत क्रमांक २ समोरील एक भलेमोठे झाड अचानक कोसळले. काही पर्यावरण तज्ञांनी त्या वृक्षाचे सर्वेक्षण केले असता, त्या झाडांची मुळे पाण्याअभावी सुकून गेल्याचे निदर्शनास आले. अशीच काहीशी अवस्था आज सिव्हील लाईन परिसरातील अनेक झाडांची आहे.रविभवन समोरील रस्त्यावर मोठ्या संख्येने वृक्ष आहे. रस्त्याच्या बांधकामामुळे व फूटपाथवर लावलेल्या टाईल्समुळे जमिनीत पाणी मुरायला जागा नाही. सिव्हील लाईनच नाही, तर रामदासपेठच्या मुख्य रस्त्यावर, महाराज बागेतील रस्त्यावर, आकाशवाणी चौक ते संविधान चौकादरम्यानच्या रस्त्यावर सुद्धा वृक्षांना पाणी मिळेल याची सोयच नाही. त्यामुळे पावसाचे पाणी सरळ वाहून जात आहे. जीपीओ चौक ते जिल्हा न्यायालय चौकादरम्यान काही वृक्षांच्या मुळापर्यंत पाण्याचा निचरा व्हावा म्हणून ‘आळे’ तयार केले आहे. महाराज बागेतील रस्त्यावरही वृक्षांना आळे तयार केले आहे. पण हे आळे सुद्धा माती आणि कचऱ्यांनी बुजले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी तिथे साचून न राहता वाहून जाणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पूर्व आणि दक्षिणेकडील फूटथपाथवर मोठ्या प्रमाणात वृक्ष आहे. पण फूटपाथ बनविताना त्या वृक्षांची मुळे टाईल्सने झाकून टाकली आहे. काही ठिकाणी वृक्षांच्या सभोवताली टाईल्स लावल्या नाही. पण पाण्याचा निचऱ्यासाठी त्याचा फायदा नाही. वाहतूक पोलीस स्टेशनजवळील एका मोठ्या वृक्षाच्या पायथ्याला सिमेंटीकरण केले आहे.अशीच काहीशी अवस्था शासकीय कार्यालय परिसरातील वृक्षांची आहे. जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील वृक्षांना डांबरी रस्त्यामुळे पाणी मुरण्याची जागाच नाही. जमिनीत पाणीच मुरत नसल्याने वृक्षांचे आयुष्य घसरत चालले आहे. जराकाही वादळ वारे सुटले की वृक्ष कोलमडण्याचे प्रकार घडत आहेत. पाण्याअभावी झाडांची मुळे कमजोर झाली आहे. प्रशासकीय इमारतीसमोरील ५० ते ६० वर्ष जूने वृक्ष अचानक कोसळल्यामुळे पर्यावरणतज्ञांनी हा धोका परिसरातील अनेक वृक्षांना असल्याचे संकेत दिले आहे.प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहेपावसाळा तोंडावर आल्यावर प्रशासन ज्याप्रमाणे नाले, ड्रेजेन लाईन सफाई करते. त्याच प्रमाणे ज्या झाडांना आळे बनविले आहे. त्यांची सफाई करून, त्याला खोल करणे गरजेचे आहे. जिथे पाणी मुरण्याची सोय नाही. तिथे वृक्षाच्या रेडीयसला अर्धा मिटरचे आळे तयार करणे गरजेचे आहे. पावसाळा तोंडावर असल्याने ही योग्य वेळ आहे. असे केल्यास वृक्षांचे अचानक कोसळणे नक्कीच थांबेल. सोबतच नवीन रस्ता बनविताना कायदाच करणे गरजेचे आहे. शहरासाठी आज वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे.कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरण तज्ञ