नागरिकांची मालमत्ता धोक्यात
क्राईम रेट वाढला, डिटेक्शन मात्र झिरो, पोलीस आहेत कुठे ?
यवतमाळ : एकेकाळी संघटित गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळात मालमत्तेच्या गुन्ह्यांचा आलेख प्रचंड वाढला आहे. यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दरदिवशी कुठे ना कुठे मोठी घरफोडी, वाटमारी हे गुन्हे घडत आहे. असे गुन्हे रोखण्यात पोलीस यंत्रणा फेल ठरली असून घडलेल्या गुन्ह्यांचा शोध लावण्यातही पोलीस अद्याप यशस्वी झालेले नाही. पोलिसांची रात्रगस्त, फिक्स पॉर्इंट छेदून गुन्हे घडत असल्याने पोलीस यंत्रणा नेमकी आहे कुठे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. यवतमाळ शहरातील प्रॉपर्टीच्या गुन्ह्यांचा क्राईम रेट प्रचंड वाढला आहे. घरफोडीची तक्रार वडगाव रोड आणि यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात आली नाही असा एकही दिवस गेल्या तीन महिन्यात उजाडलेला नाही. त्यातही मोठ्या घरफोड्यांचीच संख्या अधिक आहे.
एक लाखांपासून दहा लाखापर्यंतचा ऐवज चोरटे लंपास करीत आहे. पोलिसांच्या कथित रात्रगस्त, फिक्स पॉर्इंट, चार्ली कमांडोला सुरुंग लावून चोरटे आपले काम फत्ते करीत आहेत. गेल्या तीन महिन्यात पोलिसांच्या नाक्कावर टिच्चून घरफोड्या करीत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळकर एवढे सुस्त का ?
चोरटे घर लुटून नेत आहेत, त्यांना पकडण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे. त्यानंतरही यवतमाळकर नागरिक सुस्त का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांच्या संपत्तीची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांना ‘तुम्ही रात्रभर नेमकी कुठे गस्त केली’ असा जाब विचारण्याची आवश्यकता असताना नागरिक घराबाहेर निघत नसल्याने, पोलीस ठाण्यांवर धडकत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वीज-पाणी मिळत नाही म्हणून अधिकार्यांना डांबून ठेवणारे यवतमाळकर आपली संपत्ती चोरट्यांनी लुटून नेल्यानंतरही पोलिसांना जाब विचारण्यासाठी रस्त्यावर का उतरत नाहीत, हे कोडे गुलदस्त्यात आहे.
पोलिसांचा महिनाभरानंतर ‘कळसा गावाला वळसा’
दिग्रस तालुक्याच्या कळसा गावात महिनाभरापूर्वी दीड लाख रुपयांचा दरोडा पडला. पोलिसांनी अन्य प्रकरणांप्रमाणे हे प्रकरणही थंडबस्त्यात ठेवले. मात्र उच्च न्यायालय आणि महिला आयोगाकडून थेट अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे व तेथून यवतमाळात ‘दट्ट्या’ येताच पोलिसांनी या एकाच घटनेवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले. या गावात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी भेटी दिल्या. एवढेच नव्हे तर पोलिसांनी तेथे तळ (कॅम्प) ठोकला आहे. एकीकडे दीड लाखाच्या चोरीसाठी पोलीस प्रशासन (महिनाभराने का होईना) प्रचंड तत्परता दाखवत असताना दुसरीकडे यवतमाळ शहर व अन्य भागात चोरटे भरदिवसा रोकड, सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेत आहे. मात्र कळसा प्रकरणाचा छडा लागल्याशिवाय पोलीस सध्या तरी अन्य घटनांची पर्वा करणार नाहीत, असे दिसते.