अंतिम फेरी ठरली चुरशीची : युवा नेक्स्ट व कॅम्पस क्लब सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : त्यांच्या सूरांची ताकद अफाट होती... गाण्यातून त्यांनी सर्वांनाच आपलेसे केले... प्राथमिक फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत त्यांच्यात झालेला आमूलाग्र बदल...त्यांची प्रगती... मिळालेली दाद...यामुळेच ते दोघे सूरसम्राटचे मानकरी ठरले. सेबी जेम्स व संकेत वाखारकर त्या विजेत्याची नावे.लोकमत युवा नेक्स्ट, कॅम्पस क्लब व बापूराव देशमुख कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सूरसम्राट’ ही गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ६ ते १४ (कॅम्पस क्लब) व १५ ते ३० (युवा नेक्स्ट) या दोन वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक फेरीतून १२-१२ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामुळे शनिवारी धरमपेठ येथील ट्राफिक चिल्ड्रेन पार्क येथे घेण्यात आलेली ही स्पर्धा चुरशीची ठरली. सारेच विजेते ठरावेत अशी स्पर्धा झाली. पहिले तीन स्पर्धक निवडताना परीक्षकांचाही कस लागला. स्पर्धेचे उद्घाटन बापूराव देशमुख कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल डॉ. एम.ए.गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी कॉलेजचे जनसंपर्क अधिकारी संदीप गोहणकर, परिजात वुई प्ले, वुई लर्न किंडर कार्डनच्या संचालिका सोनाली वाघमारे, हार्मोनी इव्हेंटसचे राजेश समर्थ व स्पर्धेचे परीक्षक प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे, संगीत विशारद मोहिनी बरडे उपस्थित होते.स्पर्धेची सुरुवात धनश्री वाटकर या स्पर्धकाच्या ‘भोर भये’ या शास्त्रीय गीताने झाली. त्यानंतर एकाहून एक सरस गीत सादर करण्यात आले. ‘देखाना हाय रे’, ‘कुहूकुहू बोले’, ‘तुही रे’, ‘तु राधिका’, ‘एक राधा एक मीरा’, ‘कही ये वो तो नही’, ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ या गीतांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी शास्त्रीय संगीतापासून कॉम्बो म्युझिकपर्यंत...भूपाळीपासून लावणीपासून अनेक गीत-संगीताचे प्रकार हाताळले. त्यामुळे भारतीय संगीताच्या भविष्यकाळातील आशेचे किरण उपस्थितांना अनुभवता आले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वितरित करण्यात आले. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक बापूराव देशमुख कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग तर सहप्रायोक परिजात वुई प्ले, वुई लर्न किंडर कार्डन व हार्मोनी इव्हेंट्स होते. स्पर्धेचे संचालन नेहा जोशी आणि अंश रंदे यांनी केले. (प्रतिनिधी)
सूरसम्राट ठरले सेबी व संकेत
By admin | Published: November 16, 2014 12:45 AM