नागपूर : नगरधन (ता. रामटेक) गावाजवळ असलेल्या सूर्यलक्ष्मी काॅटन मिल्सच्या गाेडाऊनमध्ये गुरुवारी (दि. २२) सकाळी १० वाजताच्यस सुमारास आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून, या आगीत गाेडाऊनमधील रुईच्या गाठी, सुताचे बंडल, कापड व इतर साहित्य जळाल्याने किमान आठ काेटी रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती मिल्सचे जनरल मॅनेजर थाेरात यांनी दिली.
सूर्यलक्ष्मी मिल्समधील कामे सुरळीत सुरू असताना गुरुवारी सकाळी आतील रुईच्या गाठींनी पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच मिल्सच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू हाेते. रुई व कापडामुळे ही आग वेळीच नियंत्रणात येण्याऐवजी गाेडाऊनमध्ये पसरली. त्यामुळे रामटेक व कामठी नगर पालिका तसेच माैदा येथील एमटीपीसी वीज प्रकल्प व अल्ट्राटेक कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांची चार गाड्यांच्या मदतीने सायंकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले हाेते. मात्र, या आगीत गाेडाऊनमधील रुईच्या गाठी, सुत व कापडाचे बंडल, एक जुनी मशीन व हार्डवेअर साहित्य जळाले. रुई व कापड उच्च दर्जाचे हाेते. त्यामुळे या आगीत किमान आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती सूर्यलक्ष्मी काॅटन मिल्सचे जनरल मॅनेजर थाेरात यांनी दिली. या आगीत जीवित हानी झाली नाही. धुरामुळे कामगार व कर्मचाऱ्यांच्या डाेळ्यांना इजा हाेऊ नये म्हणून वैद्यकीय उपाययाेजना करण्यात आल्या हाेत्या, असेही थाेरात यांनी स्पष्ट केले.
आगीचे कारण अस्पष्ट
सूर्यल्क्ष्मी काॅटन मिल्समध्ये कापसाच्या रुईपासून सुत व सुतापासून उच्च दर्जाचे डेनिम जिन्स कापड तयार केले जाते. कंपनीच्या आवारातील राेडच्या एका बाजूला स्पिनिंग व टेक्सटाईल मिल आहे तर दुसऱ्या बाजूला गाेडाऊनची स्वतंत्र इमारत आहे. या इमारतीत विजेची साेय नाही. प्रकाशासाठी वर काचा लावल्या आहेत. त्यामुळे ही आग गाेडाऊनमधील रुईच्या गाठी साेडताना लाेखंडी पट्ट्यांचे घर्षण हाेऊन पडलेल्या ठिणगीमुळे किंवा कामगारांच्या चुकीमुळे लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.