नागपूर : चालकाचा ताबा सुटल्याने सुसाट वेगात असलेली कार दुभाजकावर आदळली. त्यात वडील व मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, पत्नीसह तिचा मामेभाऊ गंभीर जखमी झाले. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान परिसरात रविवारी (दि. २१) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली.
परवेज कुर्शीद अन्सारी (३६) व आफिफा परवेज अन्सारी (१२) अशी मृतांची तर अमराह परवेज अन्सारी (३३) व कारचालक नदीम नईस अन्सारी (२८) अशी जखमींची नावे आहेत. चौघेही सिहारा, ता. दामपूर जिल्हा बिजनाैर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहेत. नदीम हा अमराह यांचा मामेभाऊ असून, त्यांचे नेहमीच कामानिमित्त बंगळुरू (कर्नाटक) येथे जाणे-येणे आहे.
चाैघेही केए-०४/एनसी-००४२ क्रमांकाच्या कारने दिल्लीहून नागपूरमार्गे बंगळुरूला जात हाेते. ते कन्हान परिसरात पाेहाेचताच नदीमचा कारवरील ताबा सुटला आणि वेगात असलेली कार दुभाजकावर आदळली. त्यात परवेज व आफिफा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अमराह व नदीम गंभीर जखमी झाले. त्या दाेघांनाही नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अमराह यांच्या तक्रारीवरून कारचालक नदीम याच्या विराेधात गुन्हा नाेंदविला असून, तपास सहायक पाेलिस निरीक्षक पराग फुलझेले करत आहेत.
मुक्कामापूर्वीच काळाची झडप
चाैघेही रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास नवी दिल्ली शहरातून बंगळुरू शहराच्या दिशेने निघाले हाेते. लांबचा प्रवास असल्याने नागपूर शहरात मुक्काम करण्याचा त्यांचा बेत हाेता. मात्र, नागपूर शहर येण्यापूर्वीच त्यांच्या कारला अपघात झाला. जखमी अमराह या शुद्धीवर आल्यानंतर पती व मुलीचा मृत्यू झाल्याचे त्यांना कळले. त्यांच्याच तक्रारीवरून पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला.