लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : चालकाचा ताबा सुटल्याने सुसाट वेगाने जाणाऱ्या कारने आधी बाजूला जाणाऱ्या चारचाकी वाहनाला हलका धक्का दिला. त्यातच या कारने समाेर असलेल्या ऑटाेला व नंतर माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार पाेलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, ऑटाेचालकालाही दुखापत झाली आहे. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर महामार्गावरील दहेगाव (रंगारी) परिसरात रविवारी (दि. २६) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
पंकज विश्वनाथ गाेमेकर (३४, रा. गाडगेनगर, नागपूर) असे गंभीर जखमी पाेलीस कर्मचाऱ्याचे तर जियाउद्दीन शेख (३०, रा. भालदारपुरा, नागपूर) असे जखमी ऑटाेचालकाचे नाव आहे. पंकज गाेमेकर यांनी पारशिवनी पाेलीस ठाण्यात नियुक्त असून, ते कर्तव्य आटाेपून एमएच-२९/वाय-६०२५ क्रमांकाच्या माेटारसायकलने पारशिवनीहून नागपूरला जात हाेते. त्यांच्या मागे एमएच-४९/एआर-९२५५ क्रमांकाचा ऑटाे व त्या ऑटाेमागे एमएच-४०/बीजे-९६५४ क्रमांकाची कार सुसाट वेगात नागपूरच्या दिशेने जात हाेती.
त्या कारमध्ये चालक व अन्य एक जण प्रवास करीत हाेते. दरम्यान, चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि त्या कारने उजव्या लेनवरून जाणाऱ्या चारचाकी वाहनाला हलका धक्का देत पहिल्यांदा ऑटाेला व नंतर माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यानंतर ती कार राेडवर उलटली. यात दुचाकीस्वार पंकज गाेमेकर यांच्यासह ऑटाेचालक जियाउद्दीन शेख जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पाेलीस उपनिरीक्षक निमगडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. त्यांनी पंकज गाेमेकर यांना उपचारासाठी नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले, तर जियाउद्दीनला पाटणसावंगी येथील प्राथमिक आरेाग्य केंद्रात नेले. कारमधील दाेघेही काेराडी (ता. कामठी) येथील रहिवासी असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.