नागपूर : सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल आल्यानंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी बाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत कायदा व सुव्यवस्थेचा तसेच पोलिसांना कोरोनाचा विळखा पडल्याच्या पार्श्वभूमीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलले. त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्नांना बगल दिली.
सीबीआय चौकशीच्या संबंधाने बोलताना ते म्हणाले की, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ११ तारखेला सुनावणी होणार आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पुढे काय ते ठरवले जाईल.
मुंबई पोलिस दलाचा तपास या प्रकरणात अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून मुंबई पोलीस दल हा तपास करण्यात सक्षम असल्याचीही पुष्टी त्यांनी जोडली. या संबंधाने उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचे मात्र त्यांनी टाळले.