जीवन रामावत - नागपूरउपराजधानीच्या सभोवताल दिसणारी हिरवळ हीच या शहराची संपत्ती आहे़ निसर्गाने चारही बाजूने नागपूरला आपल्या कुशीत सुरक्षित करून घेतले आहे़ झाडांची संख्या जास्त असल्याने अर्थातच येथे प्रदूषणाचे प्रमाण कमी आहे़ यावर अलीकडेच एका नामांकित पर्यावरण संस्थेने शिक्कामोर्तबही केले. संबंधित संस्थेने नागपूर पूर्णत: वायू व जल प्रदूषण मुक्त असल्याचे सांगितले आहे. त्यासंबंधी नागपूर महानगरपालिकेला एक रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. जागतिक निसर्ग पर्यावरण दिनानिमित्त नागपूरकरांसाठी हा सुखद दिलासा असला, तरी उपराजधानीला भविष्यातही असेच प्रदूषणमुक्त ठेवायचे असेल, तर नवीन काही संकल्प या निमित्ताने करावा लागणार आहे़कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) दुसऱ्या एका सर्वेक्षण रिपोर्टनुसार उपराजधानीला घातक धुलिकणांनी वेढले आहे. यातून शहराच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यासंबंधी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने गत एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४ दरम्यान राज्यातील विविध मोठ्या शहरांसह नागपुरातील उत्तर अंबाझरी मार्ग, हिंगणा एमआयडीसी, सदर व सिव्हिल लाईन्स परिसरातील प्रदूषणाचे अध्ययन केले आहे. यात चारही भागात श्वासाव्दारे थेट शरीरात जाणाऱ्या (रेस्पायरेबल सस्पेन्डेट पार्टिक्युलेट मॅटर) धुलिकणाचे फार मोठे प्रमाण आढळून आले आहे. एमपीसीबीच्या रिपोर्टनुसार या धुलिकणांचे ६० ( मायक्रोग्रॅम- क्युबिक मीटर) प्रमाण सामान्य मानल्या जाते. परंतु उपराजधानीतील चारही भागात या धुलिकणांचे प्रमाण ५५ ते १४९ मायक्रोग्रॅम - क्युबिक मीटरपर्यत आढळून आले आहे. जे आरोग्यासाठी हानीकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, ‘स्मॉग’ ही नागपुरातील दुसरी सर्वांत मोठी समस्या बनली आहे. शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची झपाट्याने संख्या वाढत आहे. या सर्व वाहनांतून निघणारा विषारी धूर व वातावरणातील ‘फॉग’ त्यातून ‘स्मॉग’ तयार होत आहे. यामुळे वातावरणात कार्बन मोनोक्साईडचा थर निर्माण होत आहे. याशिवाय शहरात सुमारे ११ मोठे तलाव आहेत. मात्र ते सर्व प्रदूषणाचा सामना करीत आहे. कोणत्याही तलावातील पाणी पिण्यासाठी सोडाच, आंघोळीयोग्य राहिलेले नाही. या सर्व तलावांत खुलेआम गडरचे पाणी सोडले जात आहे. त्या पाण्यात नायट्रोजन फॉस्फरस असल्याने तलावातील पाण्यात शेवाळ व जलकुंभीसारख्या वनस्पती वाढत आहे. त्याचवेळी शहराची सुंदरता वाढविण्याच्या मोहात क्रॉंक्रिट रस्त्यांचा जंगल तयार केला जात आहे. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न जिरता, बाहेर वाहून जात आहे. परिणामी शहरातील भूजल पातळी झपाट्याने खोल जात आहे. ही सुद्धा उपराजधानीसाठी धोक्याची घंटा आहे.
निसर्गाच्या कुशीत उपराजधानी सुरक्षित!
By admin | Published: July 28, 2014 1:33 AM