नागपूर : गोरेवाडा प्रकल्पाच्या युनिट क्रमांक दोन मधील चौकी क्रमांक 4 येथे रात्रपाळीत चौकीदार म्हणून काम करणाऱ्या रवींद्र काळबांडे (40) याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजता त्याचा मृतदेह चौकीमध्येच आढळला. चौकी धुराने काळवंडलेली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू जळाल्याने झाला की गुदमरल्याने अथवा अन्य कारणाने याबद्दल निष्कर्ष निघालेला नाही.
गोरेवाडा प्रकल्पाच्या स्थापनेपासून रवींद्र काळबांडे हा कंत्राटी मजूर म्हणून कामाला होता. गोरेवाडा प्रकल्पाच्या युनिट मध्ये असलेल्या चौक्यांवर रात्रपाळीतील चौकीदार पाळीने कामावर असतात. रविवारच्या रात्री रवींद्र काळबांडे हा युनिट क्रमांक दोन मधील चार नंबरच्या चौकीवर रात्रपाळीत कामावर होता. ही चौकी अगदी काटोल-कळमेश्वर रोडवरच आहे. रविवारी सकाळी त्याची शिफ्ट बदलल्यावर चार्ज घेणारा दुसरा चौकीदार गेला असता हा प्रकार लक्षात आला.
चौकीचे लोखंडी दार आतून बंद होते. ही चौकी आतून पूर्णतः धुराने काळवंडलेली होती. तसेच एका पिम्पावर घमेल्यात शेकोटीसाठी पेटवलेली राख असल्याचे लक्षात आले. मृताच्या अंगावरील कपडे कायम असले तरी त्याचे अंथरूण मात्र पूर्णतः जळालेले होते. शरीरावर हातावरील जखम वगळता अन्य ठिकाणी आगीच्या जखमा नव्हत्या. यासंदर्भात गोरेवाडा प्रकल्पाचे अधिकारी प्रमोद पंचभाई यांना विचारणा केली असता, गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला. रवींद्र काळबांडे हा फेटरी या गावातील असून तो वनमजूर म्हणून कार्यरत होता. त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले असून गिट्टीखदान पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.