लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट पोलिसांच्या धाकामुळे दोन तरुणांचा नाल्यात बुडून करुण अंत झाला. शेख जावेद शेख इकबाल (वय २२, रा. हसनबाग) आणि इरफान शेख जिब्राईल शेख (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. हे प्रकरण संशयास्पद असल्याने आज दिवसभर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती.जावेद, इरफान आणि त्यांचे पाच ते सात मित्र शुक्रवारी दुपारी सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढुर्णा गावाजवळ जुगार खेळत बसलेले होते. अचानक त्यांच्याकडे काही जण धावत आले. ते पोलीस असावे, असे समजून जुगार खेळणाºया तरुणांनी वाट मिळेल तिकडे पळ काढला. जावेद आणि इरफानने बाजूच्या नाल्यात उड्या घेतल्या. त्यात किती पाणी आहे, याचा अंदाज नसल्यामुळे आणि पोहणे येत नसल्यामुळे जावेद आणि इरफान पाण्यात बुडून मेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी सक्करदरा पोलिसांनी नाल्यावर जाऊन सामाजिक कार्यकर्ते जगदीश खरे यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा घातल्याच्या घटनेचा इन्कार केला आहे. त्यामुळे जुगार अड्ड्याकडे छापा टाकण्याच्या अविर्भावात धावत येणारे तोतये पोलीस असावे, असा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सक्करदरा पोलीस तपास करीत आहेत.
नागपुरात सक्करदऱ्यातील नाल्यात दोघांचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 1:08 AM