आरती दीपक मारबते (२४) रा. तास असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आरती मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घरून निघून गेली व गावातीलच ग्रामपंचायतीच्या शासकीय विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच ठाणेदार महेश भोरटेकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहचले. लागलीच त्यांनी तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालविले. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. बुधवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला. आरतीला दीड वर्षाची मुलगी आहे. पती दीपक हा मजुरीचे काम करतो. पती-पत्नी यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जाते. -----
आरतीच्या आईवडिलांची पोलिसात तक्रार
आरतीच्या मृत्यूबाबत माहिती न देता तिच्या सासरच्या मंडळीनी परस्पर अंत्यसंस्काराचा प्रयत्न केला असा आरोप करत, आरतीची आई वच्छला व वडील ईश्वर मोहनकर रा. तारणा यांनी भिवापूर पोलिसात तक्रार नोंदविली आहे. आरतीच्या मृत्यूला पती दीपक, त्याचा भाऊ, आई व आजोबा या चार जणांविरुध्द तक्रार नोंदविली आहे. शिवाय आरतीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. सासरच्या मंडळीकडून तिचा छळ होत होता, असा आरोप त्यांनी केला आहे.