नरेश डोंगरे नागपूरमध्यवर्ती कारागृहात अराजकता निर्माण करणारे आणि ‘जेल ब्रेक’ला कारणीभूत असलेले निलंबित कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांच्यावर संबंधित प्रशासनातील वरिष्ठ ‘जेल ब्रेक’नंतरही मेहेरबान आहेत. त्याचमुळे राज्यातील कारागृह प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या कांबळेची उर्मटगिरी अद्याप कायमच आहे. निलंबनानंतर मुख्यालय बदलवूनही कांबळे नागपूर सोडायला तयार नाहीत. खाबूगिरीसाठी चटावलेल्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून चोरी-छुपे मोबाईल आणि अन्य काही चीजवस्तू पुरविणे सुरू केले. दोन वर्षांपूर्वी येथे वैभव कांबळे अधीक्षक म्हणून बदलून आले. त्यांनी अतिरेकच केला. कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्यांनी कारागृहात अक्षरश: अराजकता निर्माण केली. खतरनाक तसेच पैसेवाल्या कैद्यांना चिकन-मटनसह खाण्यापिण्याच्या गोडधोड चीजवस्तू, खर्रा, तंबाखूपासून पाहिजे तो अंमली पदार्थ तसेच मोबाईलसह अनेक सुखसुविधा उपलब्ध होऊ लागल्या. एका कैद्याजवळ दोन दोन, तीन तीन मोबाईल वाजू लागले. कारागृहात पार्ट्या झडू लागल्या. कैद्यांकडून बक्कळ रक्कम उकळणाऱ्या कांबळे आणि त्याच्या मर्जीतील तुरुंगाधिकाऱ्यांनी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाला खतरनाक गुन्हेगारांचे ‘रेस्ट हाऊस’बनविले. कारागृहातून बाहेर पडलेले गुन्हेगार पुन्हा खून, बलात्कार, खंडणी वसुली, घरफोडी, लुटमारी, चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे वारंवार करू लागले. कोण आहेत पाठीराखे ? कांबळेंच्या भूमिकेने कारागृहात निर्माण झालेल्या वातावरणामुळे कोणत्याही दिवशी गंभीर घटना घडू शकते, असा स्पष्ट अहवाल तत्कालीन कारागृह उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांनी कारागृह प्रशासनाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांच्याकडे पाठविला होता. मात्र, तब्बल ५३ वेळा विरोधी अहवाल पाठवूनही कांबळेंवर कोणतीही कारवाई झाली नाही. कारवाई तर सोडा संबंधित वरिष्ठांनी साधी शहानिशाही केली नाही. त्याचमुळे ‘जेल ब्रेक’ घडले. कारागृहात अराजकता निर्माण करून कांबळे यांनी सामाजिक सुरक्षा धोक्यात आणल्याचे भयावह वास्तव पुढे आले. त्यामुळे त्यांच्यासकट अन्य निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही मोक्का लावण्याची जोरदार मागणीही झाली. मात्र, तसे काहीही झाले नाही. मुख्यालय बदलविण्याच्या प्रक्रियेकडे वरिष्ठांकडून कानाडोळा केला जात असल्याची संबंधित वर्तुळात धुसफूस आहे. त्यामुळे कांबळेंच्या पाठीमागे कोणती ‘पॉवरफूल लॉबी’आहे, असा प्रश्न चर्चेला आला आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने वारंवार संपर्क केला, मात्र त्यांच्याशी बोलणी होऊ शकली नाही.
निलंबित कांबळेंचे कारागृह परिसरातच ‘वैभव’!
By admin | Published: June 19, 2015 2:32 AM