पारशिवनी : तालुक्यातील साहोली रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी जात आहे. या रेतीचोरी प्रकरणी शासकीय मालमत्तेची हानी व आर्थिक नुकसानीचा ठपका ठेवत साहोली येथील पोलीस पाटील दिवाकर ठवरे यांना निलंबित करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.साहोली शिवारातूून वाहणाऱ्या कन्हान नदीवर दोन रेतीघाट आहेत. या दोन्ही रेतीघाटांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचोरी केली जाते. या घाटांमधील रेती खापरखेडा, कामठी व नागपूर येथे नेली जाते. शिवाय, रेतीघाटाच्या परिसरात असलेल्या झुडपी जंगलात रेतीचा अवैध साठाही केला जातो. ही बाब पोलीस पाटील ठवरे यांना माहीत असूनही त्यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी रामटेक यांना कुठलीही माहिती अथवा सूचना दिली नाही. दरम्यान, नायब तहसीलदार जगदाळे यांच्रूा नेतृत्वातील पथकाने १४ सप्टेंबरच्या रात्री साहोली रेतीघाटात धाड टाकली. त्यात त्यांना या रेतीघाटात रेतीचे अवैध उत्खनन केले जात असल्याचे आढळून आले. तसेच त्यांनी रेतीची अवैध वाहतूक करणारा एमएच-३१/डब्ल्यू-७९७७ क्रमांकाचा ट्रक जप्त केला. या प्रकरणी पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. सदर प्रकरणाची उपविभागीय अधिकारी शेखर सिंह यांनी सखोल चौकशी केली. त्यात सदर ट्रक हा अर्चना दिवाकर ठवरे रा. साहोली, ता. पारशिवनी यांच्या नावे असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. सदर ट्रक हा साजन बागडे रा. साहोली याला किरायाने चालवायला दिला होता. या कराराची मुदत ९ जुलै रोजी संपली असून, नव्याने करार करण्यात आला नाही. तसेच पोलीस पाटील ठवरे व त्यांचे सहकारी अवैध रेती उत्खननात सहभागी असल्याचे चौकशीदरम्यान आढळून आले. त्यामुळे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ चे कलम ६ (३) अन्वये ठवरे यांना दोषी ठरवित कलम ९ ब, इ, फ नुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
साहोलीतील पोलीस पाटील निलंबित
By admin | Published: December 29, 2014 2:48 AM