लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या शहरातील एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यासह पाच पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यांना परत पोलीस दलात रुजू करून घेण्यात आल्याचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे, पाचपैकी वादगस्त पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना केवळ दीड महिन्यांपूर्वीच निलंबित करण्यात आले होते. या आदेशामुळे वादग्रस्त पोलीस कर्मचारी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हावी झाल्याची जोरदार चर्चा शहरात पसरली आहे.मंगेश देशमुख, जयंत शेलोट, आयशा शेख, विवेक मरस्कोल्हे आणि मनोज घोडे अशी निलंबनानंतर रुजू होण्याचा आदेश मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यापैकी घोडेला १९ मार्च २०१८ ला, मरस्कोल्हेला ५ एप्रिलला, आयशा यांना २१ आॅगस्ट, शेलोटला २१ सप्टेंबरला तर देशमुखला २८ सप्टेंबरला निलंबित करण्यात आले होते. या पाचही पोलिसांवर कर्तव्यात कसूर करून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आयशाने एका दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. देशमुखची आॅडिओ क्लीप वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पोहोचली होती. तर, शेलोट हा शहरातील कुख्यात गुन्हेगारांसोबत ‘तेरे जैसा यार कहां’च्या गाण्यावर नाचत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. शेलोटच्या या व्हिडीओत अवैध धंद्यातगुंतलेल्यांसह कुख्यात गुन्हेगारही दिसत होते. शेलोटवर अनेकदा गंभीर आरोप लागले असून, एका प्रकरणात तो कारागृहातही राहून आला आहे. त्याला निलंबित करण्यात आल्यानंतर शहरातील पोलीस कर्मचारीच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले होते. दुसरीकडे सर्वांसोबत लाडीगोडीचे संबंध ठेवणारे अनेक दलाल सक्रिय झाले होते. त्यांनी जोरदार लॉबिंग केले आणि अधिकाऱ्यांचे मन वळवून अखेर केवळ दीड महिन्यात शेलोटला पुन्हा रुजू करून घेण्यात यश मिळविले. निलंबित कर्मचाऱ्याला किमान तीन महिने पुन्हा सेवाबहाली करू नये, असा एक दंडक पाळला जात होता. देशमुख-शेलोटच्या प्रकरणात हा दंडक बासनात गुंडाळण्यात आला. या निर्णयामुळे खुद्द पोलीस दलातच खळबळ निर्माण झाली आहे. अन्य निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही हाच दंडक पाळला जाणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.