अमरावती जिल्ह्यातील ‘ड्राय डेज’वर स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 08:52 PM2018-09-11T20:52:20+5:302018-09-11T20:53:27+5:30
गणेश स्थापना व गणेश विसर्जन निर्विघ्न पार पडावे याकरिता अमरावती जिल्ह्यासाठी घोषित ‘ड्राय डेज’वर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विविध बाबी लक्षात घेत अंतरिम स्थगिती दिली. तसेच, ‘ड्राय डेज’ कोणत्या आधारावर घोषित केले यावर येत्या शुक्रवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेश स्थापना व गणेश विसर्जन निर्विघ्न पार पडावे याकरिता अमरावती जिल्ह्यासाठी घोषित ‘ड्राय डेज’वर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विविध बाबी लक्षात घेत अंतरिम स्थगिती दिली. तसेच, ‘ड्राय डेज’ कोणत्या आधारावर घोषित केले यावर येत्या शुक्रवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील कलम १४२(१) अंतर्गत अधिकारांचा वापर करून ‘ड्राय डेज’ची अधिसूचना जारी केली होती. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ९ सप्टेंबर (पोळा), १३ सप्टेंबर (गणेश स्थापना) व २४ ते ३० सप्टेंबर (गणेश विसर्जन) या दिवशी सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले होते. त्याविरुद्ध नितीन मोहोड व सुनील खुराणा या मद्यविक्रेत्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
न्यायालयाने गेल्या शुक्रवारी पहिल्या सुनावणीनंतर अधिसूचनेवर स्थगिती न देता जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून यावर मंगळवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे पोळ्याच्या दिवशी अधिसूचनेनुसार मद्यविक्री बंद होती. हे प्रकरण निर्धारित तारखेवर म्हणजे, मंगळवारी सुनावणीसाठी आले जिल्हाधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर सादर करता आले नाही. परिणामी, न्यायालयाने वादग्रस्त अधिसूचनेवर अंतरिम स्थगिती देऊन येत्या १४ तारखेपर्यंत योग्य स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. आता या प्रकरणावर १४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्यामुळे गणेश स्थापनेचा दिवस मद्य विक्रीच्या बंदीतून सुटला आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.