लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या कारखाना विभागात स्पेअर पार्ट घोटाळा प्रकरणी शुक्रवारी तीन अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. ८ डिसेंबर रोजी आयोजित महापालिकेच्या सभेत काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी पुरावे सादर करीत स्पेअर पार्ट घोटाळा उघडकीस आणला होता. महापौरांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले होते. मात्र, विभागीय चौकशीनंतर निलंबनाचा निर्णय घेण्यात आला.घोटाळ्यात कारखाना विभागाचे प्रमुख विजय हुमणे, यांत्रिकी अभियंता राजेश गुरमुले, हॉटमिक्स विभागाचे उपविभागीय अभियंता उज्ज्वल लांजेवार, मोटर वाहन निरीक्षक मनीष कायरकर, प्र. मोटर वाहन निरीक्षक विक्रम मानकर यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कारखाना विभागात फक्त सहा कर्मचारी आहेत. त्यापैकी आता चार जणांना निलंबित करण्यात आल्यामुळे उरलेल्या दोनच कर्मचाऱ्यांना संपूर्ण कारभार पहावा लागणार आहे.कारखाना विभागातर्फे वाहनांना लावण्यात येणारे टायर, ट्यूब, बॅटरी, कपलिंग, एक्सवेटर, वॉल्व्ह आदींची दुप्पट ते तिप्पट अधिक दराने खरेदी केली. गेल्या दोन वर्षात २.३१ कोटी रुपयांची सामुग्री खरेदी करण्यात आली. त्यामुळे लाखो रुपयांची अनियमितता झाल्याची शक्यता आहे. महापालिकेकडे लहान मोठे २०१ वाहन आहेत. सन २०१५-१६, २०१६-१७ मध्ये घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. त्या काळात कारखाना विभागाचे यांत्रिकी अभियंता (कारखाना) यू.बी. लांजेवार हे होते. त्यानंतर त्यांची बदली हॉटमिक्स विभागात करण्यात आली होती. संबंधित काळात घोटाळा झाल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले.दरम्यान, नगरसेवक संदीप सहारे यांनी महापालिकेच्या सभागृहात अशी माहिती दिली की, टाटाच्या गाडीसाठी ३५ हजार ९५० रुपये खर्च करून टायर खरेदी करण्यात आले. प्रत्यक्षात या टायरची किंमत १४ हजार ८०० रुपयेच होती. रिडायल टायर ८५ हजार ४५६ रुपयात खरेदी करण्यात आले. त्याची किंमत १८ हजार ४०० रुपये आहे. एक्साईड बॅटरी टाटा सुमोसाठी १८ हजार ५०० रुपये व जेसीबी साठी २९ हजार ५७० रुपये एवढा दर कारखाना विभागाने निश्चित केला आहे. मात्र, बाजारात तिची किंमत क्रमश: ५ हजार ३९२ व १२ हजार ७०० रुपये आहे. अशा अनेक उपकरण व साहित्याचे बाजारातील दर व प्रत्यक्षात खरेदी करण्यात आलेले दर सांगत त्यांनी घोटाळा झाल्याचे पुरावे सादर केले होते.ज्युनियर इंजिनियरला दिला चार्ज निलंबनामुळे रिक्त झालेल्या कारखाना विभागाचे यांत्रिकी अभियंता व हॉटमिक्स विभागाचे उपविभागीय अभियंता पदाची जबाबदारी ज्युनियर इंजिनियर योगेश लुंगे यांना देण्यात आली आहे. लुंगे परिवहन विभागात समिती सभापती कक्षात कार्यरत आहेत. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आश्चर्यकारक आहे. लुंगे हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत. कारखाना विभागात त्यांची उपयोगिता समजू शकते. मात्र, हॉटमिक्स विभागात त्यांची करण्यात आलेली नियुक्ती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. लुंगे यांच्यापेक्षा अधिक अनुभवी व वरिष्ठ अधिकारी हॉटमिक्स विभागात आहेत. यामुळे हॉटमिक्स विभागात असंतोष पसरला आहे. हॉटमिक्सचे अनुभवी व वरिष्ठ अधिकारी ज्युनियर इंजिनियरला अतिरिक्त चार्ज दिल्यामुळे नाराज आहेत. याचा परिणाम कामावरही होऊ शकतो.