जनरल नर्सिंगसाठी मिळाले आश्वासन : रुग्णालय प्रशासनाने सोडला नि:श्वासनागपूर : बंद पडलेले जनरल नर्सिंग सुरू करणे, मानधनावर असलेल्या परिचारिकांना सरळ सेवेत सामावून घेणे आणि आरोग्य विभागाच्या परिचारिकांच्या बदल्या रद्द करणे आदी मागण्यांवर शासनाने आश्वासन दिल्याने महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने मंगळवारपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला तूर्तास स्थगिती दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वी जनरल नर्सिंग व मिडवायफरी अभ्यासक्रम नियमित सुरू होता. मागील अनेक वर्षांपासून हा अभ्यासक्रम शासनाने बंद केला होता. तो अभ्यासक्रम सुरू करण्यास आता शासनाने मान्यता दिली आहे. बंदपत्रितचा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी संघटनेची होती. या मागणीसंदर्भात ज्येष्ठ परिचारिकांना बंदपत्रितची अट शिथिल करण्यात आली असून, राज्यात सेवेत असलेल्या ११०० ज्येष्ठ परिचारिकांना वगळण्याचे शासनाने मान्य केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात झालेल्या सामूहिक बदल्या रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याशिवाय परिचारिकांच्या इतरही आर्थिक मागण्यांसंदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन देशातील तसेच राज्यातील रुग्णसेवेत गुंतलेल्या परिचारिकांना समान काम, समान वेतन या तत्त्वाच्या आधारे राज्यातील परिचारिकांना त्वरितन्याय देण्याची आग्रही मागणी संघटनेची होती, या मागणीवर शासन विचार करणार आहे. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे व नैसर्गिक आपत्तीकाळात रुग्णसेवा विस्कटू नये यासाठी संप मागे घेण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिष्टमंडळात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे अध्यक्ष अनुराधा आठवले, सरचिटणीस कमल वायकोळे, कार्याध्यक्ष प्रभा भजन आदी सहभागी होत्या. संपाच्या स्थगितीमुळे रुग्णालयाला मोठा दिलासा मिळाला आहे.(प्रतिनिधी)
परिचारिकांच्या संपाला तूर्त स्थगिती
By admin | Published: August 05, 2014 1:01 AM