लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे वाघिणीला न्यायालयाच्या पुढील निर्देशापर्यंत जीवनदान मिळाले आहे.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी हा आदेश काढला होता. त्याविरुद्ध वन्यजीवप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्या सरिता सुब्रमण्यम यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. राळेगाव व केळापूर तालुक्यातील सखी, सावरखेडा व उमरी वनात वास्तव्य असलेल्या या वाघिणीने आतापर्यंत ११ जणांचे बळी घेतले असे वन विभागाचे म्हणणे आहे. वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्न केले जात आहेत. परंतु, त्यात यश मिळाले नाही. शेतकरी व मजुरांना अधूनमधून वाघिणीचे दर्शन होते. त्यानंतर वन विभागाचे पथक संबंधित ठिकाणी रवाना होते, पण तेव्हापर्यंत वाघिण अदृश्य होते. तिला पकडण्यासाठी कॅमेरेही लावण्यात आले आहेत. याचिकाकर्तीने ही वाघिण नरभक्षक नसल्याचा दावा केला आहे. वाघिणीला ठार मारण्याचा आदेश रद्द करून तिला बेशुद्ध करून पकडण्यात यावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. प्रकरणावर आता येत्या शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्तीतर्फे अॅड. रवींद्र खापरे व अॅड. दिग्विजय खापरे यांनी कामकाज पाहिले.
नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 8:00 PM
यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे वाघिणीला न्यायालयाच्या पुढील निर्देशापर्यंत जीवनदान मिळाले आहे.
ठळक मुद्देहायकोर्ट : वन विभाग म्हणतो ११ बळी घेतले