ब्रह्मपुरीतील वाघिणीला बेशुद्ध करण्यावर स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 08:47 PM2018-03-23T20:47:29+5:302018-03-23T20:47:44+5:30
स्वत:च्या चार बछड्यांसह ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून बाहेर निघून रहिवासी क्षेत्रात फिरत असलेल्या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच, वन विभागाला नोटीस बजावून यावर २८ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:च्या चार बछड्यांसह ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून बाहेर निघून रहिवासी क्षेत्रात फिरत असलेल्या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच, वन विभागाला नोटीस बजावून यावर २८ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.
या आदेशाविरुद्ध स्वानंद सोनी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी २० मार्च रोजी हा आदेश जारी केला होता. वाघिणीचे बछडे तीन महिन्यांचे असून ती सध्या जंगलाच्या बाहेर फिरत आहे. काही शेतकऱ्यांना ती शेतात बसलेली दिसून आली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्या वाघिणीचा माणसांशी संघर्ष होऊ नये यासाठी हा आदेश जारी करण्यात आला होता. वाघिणीला बेशुद्ध करून पकडून जंगलात सोडण्याचा वन विभागाचा उद्देश होता. याचिकाकर्त्याने हा आदेश अवैध असल्याचे याचिकेत म्हटले आहे. हा आदेश कायद्यानुसार नाही. वाघिणीला चार बछडे आहेत. बेशुद्ध करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ते एकमेकांपासून दुरावू शकतात. बछड्यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. वाघीण जंगलात जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे तिला बेशुद्ध करून पकडण्याची गरज नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अक्षय नाईक व अॅड. राहुल कलंगीवाले यांनी कामकाज पाहिले.