लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बॉम्बचा संशयात पकडण्यात आलेले वाहन दारू तस्कराचे निघाले. अंबाझरी पोलिसांनी वाहनातून १.६० लाखाची दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी हिंदुस्थान कॉलनीतील सुमन कॅथल येथे करण्यात आली. अमरावती रोडवर हिंदुस्थान कॉलनीमध्ये सुमन कॅथल अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रात्री अज्ञात आरोपी महिंद्रा एक्सयूव्ही क्रमांक एम.एच. ०३/बी.जे./९९७९ पार्क करून फरार झाले. बुधवारी सकाळी अपार्टमेंटच्या चौकीदाराची वाहनावर नजर गेली. त्याने अपार्टमेंटमधील लोकांना वाहनाबाबत विचारणा केली. परंतु सर्वांनीच आपण वाहन पार्क केले नसल्याचे सांगितले. तेव्हा अंबाझरी पोलिसांना सूचना देण्यात आली. अंबाझरी पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. वाहनाच्या काचावर काळ्या रंगाची फिल्म लागलेली होती. वाहनाच्या आत काय आहे, हे पाहण्यासाठी पोलिसांनी वाहन हलविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आवाज येऊ लागला. पोलिसांना यात विस्फोटक किंवा घातक वस्तू असल्याचा संशय आला. पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बोलावून घेतले. यानंतर वाहनाची काच तोडण्यात आली. तेव्हा त्यात दारू असल्याचे उघडकीस आले.गाडीमध्ये दारूचे ६० बॉक्स सापडले. यात अहमदनगर येथे निर्मित देशीदारू सापडली. पोलिसांनी दारू व वाहन जप्त केले आहे. दिवसभर वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यात आला. परंतु त्याचा कुठलाही पत्ता लागला नाही. रात्री दारू तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला.अशी शक्यता वर्तविली जात आहे की, जप्त दारू गुपचूपपणे प्रतिबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचविली जात होती. मंगळवारी रात्री शहरातील अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू होती. त्यामुळे आरोपींनी घाबरून वाहनअपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लपविले. बुधवारी सकाळी वाहन घेऊन जाण्याची त्यांची योजना असावी. परंतु त्यापूर्वीच पोलीस पोहोचले. कारचा नंबर दुसऱ्या शहरातील असल्याने तो बोगस असल्याचा संशय आहे. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार विजय कारे, एएसआय आशिष कोहळे, सचिन बंसोड, विजय गिरी, अंकुश घटी, योगेश काटरपवार, बलजित ठाकूर आणि दिनेश जुमनाके यांनी केली.
नागपुरात बॉम्बच्या संशयात सापडली दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:02 AM
बॉम्बचा संशयात पकडण्यात आलेले वाहन दारू तस्कराचे निघाले. अंबाझरी पोलिसांनी वाहनातून १.६० लाखाची दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी हिंदुस्थान कॉलनीतील सुमन कॅथल येथे करण्यात आली.
ठळक मुद्देअपार्टमेंटमध्ये सापडले बेवारस वाहन : अंबाझरी पोलिसांची कारवाई