सुमेध वाघमारे
नागपूर : मेयो, मेडिकलमधील कोरोना रुग्णांकडे लक्ष ठेवण्यासाठी एका खासगी कंपनीकडून ‘डोझी’ उपकरणाची मदत घेण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्यापूर्वीपासून लावण्यात आलेल्या या उपकरणाचे भाडे दोन्ही रुग्णालय मिळून जवळपास एक कोटी ४३ लाख २४ हजार ४००वर गेले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचे रुग्ण नसतानाही कंपनीने भाडे लावल्याने यात आर्थिक घोटाळा झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
कोरोनाचा दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सप्टेंबर २०२० मध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) डोझी उपकरण लावण्यास शासनाने मंजुरी दिली. एका खासगी कंपनीने मेयोत १५०, तर मेडिकलमध्ये १०० उपकरणे लावली. प्रत्येक कोरोना रुग्णाच्या गादी खाली लावलेले हे उपकरण रुग्णाच्या आरोग्याची पूर्वचेतावणी देणारी एक प्रणाली होती. यात रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी, हृदयाची गती, श्वसनदर, रक्तदाब, स्लीप ॲपनिया निर्देशांक, रुग्णाचा अस्वस्थता निर्देशांक तसेच हृदयासंबंधी सर्व माहिती वॉर्डातील एका स्क्रिनवर व डॉक्टरांच्या मोबाईलवर उपलब्ध होत होती. याचा फायदा अनेक रुग्णांनाही झाला. परंतु जेव्हा कोरोनाचे मोजकेच रुग्ण होते त्यावेळीही त्याचे भाडे आकारण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
- रुग्ण ३५, डोझी उपकरण २५०
कोरोनाची दुसरी लाट मे २०२१ पासून ओसरण्यास सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात १८३, सप्टेंबर महिन्यात २७३, ऑक्टोबर महिन्यात १४९, नोव्हेंबर महिन्यात १६२ तर डिसेंबर महिन्यात ४३५ रुग्ण होते. यातील बहुसंख्य रुग्ण होम क्वाॅरण्टाइन होते. यामुळे मेयो, मेडिकलमध्ये रुग्णांची संख्या जेमतेम होती. जानेवारी २०२२ पासून तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. परंतु मेडिकलमध्ये रोजच्या रुग्णांची संख्या ७५ वर, तर मेयोमध्ये ५०वर गेली नाही. १६ फेब्रुवारी रोजी मेडिकलमध्ये २५, तर मेयोमध्ये १० असे एकूण ३५ रुग्ण असतानाही २५० डोझी उपकरण अद्यापही कायम आहेत.
- मेयोतील भाडे ८३ लाखांवर
मेयोतील १५० डोझी उपकरणांचे भाडे कंपनीने ८३ लाख २४ हजार ४०० रुपये काढले आहे. यातील पहिल्या टप्प्यात ३३ लाख एक हजार २०० रुपये तर दुसऱ्या टप्प्यात २० लाख नऊ हजार २८० असे एकूण ५३ लाख दहा हजार ४८० रुपये भरले आहेत. अजूनही ३० लाख १३ हजार ९२० रुपये शिल्लक आहेत. विशेष म्हणजे जेव्हा कोरोनाचे रुग्ण नव्हते त्यावेळी हे उपकरण ‘आरआयसीयू’, ‘एसआयसीयू’, ‘पोस्ट कोविड रेसपीरेट्री वॉर्ड’ व ‘पोस्ट ऑपरेटिव्ह’ वॉर्डमध्ये वापरल्याचे मेयोचे म्हणणे आहे. परंतु हे उपकरण अतिदक्षता विभागासाठी नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- मेडिकलचे भाडे ६० लाखांवर
मेडिकलमधील १०० डोझी उपकरणांचे भाडे जवळपास ६० लाखांवर गेले आहे. यातील पहिल्या टप्प्यात मेडिकलने २० लाख रुपये भरले. महत्त्वाचे म्हणजे, मेडिकल प्रशासनाने कोरोनाचे रुग्ण फार कमी असल्याचे सांगून ऑगस्ट २०२१ मध्ये कंपनीला आपले उपकरण काढून टाकण्याचा सूचना दिल्या. परंतु कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. सध्या कंपनीने ४० लाख भाड्याची मागणी केली आहे. परंतु मेडिकल प्रशासनाने १४ लाख भरण्याची तयारी दाखवल्याची माहिती आहे.